गवंड्याच्या मुलाने बनविले हृदयविकारावरील औषध!
By admin | Published: April 10, 2017 04:02 AM2017-04-10T04:02:47+5:302017-04-10T08:06:26+5:30
बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातही हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ झाली असून तरुणही त्यास बळी पडत
विनोद गोळे / पारनेर (अहमदनगर)
बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातही हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ झाली असून तरुणही त्यास बळी पडत असल्याची चिंताजनक स्थिती आहे. हृदयविकारावर मात करण्यासाठी बायपास सर्जरी किंवा अॅन्जिओप्लास्टी करावी लागते़ मात्र, हृदयाच्या धमन्यांमध्ये गाठीच होऊ नये, यासाठी किन्ही येथील मूळचे रहिवासी असलेले शास्त्रज्ञ विनायक खोडदे यांनी चक्क औषध शोधले आहे़ अमेरिकेतील जॉन हाफकिन्स संशोधन संस्थेत ते त्यावर अधिक संशोधन करत आहेत.
सहा महिन्यांपूर्वी त्यांची जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन केंद्र असणाऱ्या या संस्थेत भारताचे शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. त्यांच्या संशोधनाचा दोन वर्षांत रुग्णांना लाभ मिळू शकतो़ किन्ही येथील विनायक यांचे वडील शहाजी गवंडी काम, तर आई ताराबाई शेती करतात़ विनायक यांनी किन्ही येथे प्राथमिक व ओंकारबाबा माध्यमिक विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले़ पारनेरमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बारावीपर्यंत व पारनेर महाविद्यालयात रसायनशास्त्रात बी. एसस्सीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे रसायनशास्त्रात एम़एस्सी़ केली़ त्यांच्या संशोधक वृत्तीमुळे पुण्यातील भारतीय औषध संशोधन केंद्रात आयसर येथे त्यांची शास्त्रज्ञ म्हणून नेमणूकही झाली़
२०११ पासून तेथे काम करताना महिलांच्या गर्भपिशवीच्या कॅन्सरवरील औषध शोधण्यासाठी त्यांनी संशोधन सुरू केले़ पाच वर्षांनी त्यांना यश आले. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली़ पत्नी उज्ज्वला त्यांना संशोधनात मदत करीत आहेत़
मी सध्या अमेरिकेतील जॉन हाफकिन्स संशोधन केंद्रात हृदयविकाराच्या औषधावर संशोधन करीत आहे. हे संशोधन दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. हृदयविकार दूर करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. - विनायक खोडदे, शास्त्रज्ञ