हृदयशस्त्रक्रियेनंतरही दिली परीक्षा
By admin | Published: April 17, 2017 04:46 AM2017-04-17T04:46:20+5:302017-04-17T04:46:20+5:30
मराठवाड्यात बीडला राहणाऱ्या ११ वर्षीय समदान शेखला जन्मत: ह्रदयरोग असल्याने त्याच्या प्रकृतीत सतत बिघाड होत होता. अखेर त्याच्या ह्रदयावर मीरा रोड येथे नुकतीच शस्त्रक्रिया झाली
राजू काळे , भार्इंदर
मराठवाड्यात बीडला राहणाऱ्या ११ वर्षीय समदान शेखला जन्मत: ह्रदयरोग असल्याने त्याच्या प्रकृतीत सतत बिघाड होत होता. अखेर त्याच्या ह्रदयावर मीरा रोड येथे नुकतीच शस्त्रक्रिया झाली. पण याही अवस्थेत त्याने डॉक्टराचा विश्रांतीचा सल्ला दूर ठेवत मोठ्या जिद्दीने अवघ्या आठ दिवसांत चौथीची परीक्षा दिली.
सलीम शेख यांचा मुलगा समदानला जन्मत:च ह्रदयरोग होता. मात्र त्याचे निदान होत नव्हते. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सतत बिघाड होत असे. वरवरच्या उपचारानंतर त्याला काही काळापुरते बरे वाटे. पण यंदा मार्चमध्ये शाळेच्या परीक्षांचा हंगाम सुरू असताना मित्राकडे अभ्यास करताना चक्कर आल्याने तो खाली कोसळला. उन्हामुळे चक्कर आल्याचा त्याच्या पालकांचा समज झाला. परंतु, वांरवार त्याला उलट्या होऊन चक्कर येऊ लागल्याने त्याला डॉक्टरांकडे नेले. तेथे त्याला उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले. समदानची परीक्षा जवळ येत होती आणि प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे बीडमधील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईत जाण्याचा सल्ला त्याच्या पालकांना दिला. शेख कुटुंबाने बोरीवलीत नातेवाईकांचे घर गाठले आणि त्याला मीरा रोडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याचे सीटी स्कॅन व इतर तपासणीनंतर हृदयरोगाचे स्वरूप स्पष्ट झाले. हृदयातून रक्तपुरवठा करणारी मुख्य धमनी आकुंचित (कोर्क्टेशन आॅफ द अॅरोटा) असल्याने शरीराला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नव्हता. मोठ्या धमनीच्या सुरुवातीला हा अडथळा होता. त्यासाठी धमनीजवळ स्टेण्ट बसवण्याच्या शस्रक्रियेचा (कोरॅकटोप्लास्टी) निर्णय घेतला. ह्रदयविकारतज्ज्ञ डॉ. अनुप ताकसांडे यांच्या चमुने ही शस्त्रक्रिया केली. सर्वसाधारणत: ती प्रौढांवर केली जाते. त्यातही समदानच्या हृदयाची पूर्णत: वाढ न झाल्याने त्याचा रक्तदाबाचे संतुलन ठेवण्याचे आव्हानही या शस्त्रक्रियेत होते. मात्र डॉ. ताकसांडे यांच्या नियंत्रणाखाली आधुनिक उपचार पद्धतीनुसार विशिष्ट प्रकारच्या फुग्यांद्वारे आकुंचित असलेल्या हृदयातील झडपा, रक्तवाहिन्या मोठ्या करुन त्याला या त्रासातून मुक्त केले. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला किमान महिन्याची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र तो झिडकारुन त्याने आठवडाभरात परीक्षा दिली.