शिक्षकाचे हृदय धडधडले शेतकऱ्याच्या शरीरात
By Admin | Published: February 3, 2017 01:41 AM2017-02-03T01:41:07+5:302017-02-03T01:41:07+5:30
दुचाकी अपघातात ब्रेन डेड झालेल्या शिक्षकाचे हृदय, दोन्ही किडन्या आणि यकृत (लिव्हर) या अवयवांचे दान करण्यात आले. बुधवारी शहरातील युनायटेड सिग्मा रुग्णालयात
औरंगाबाद : दुचाकी अपघातात ब्रेन डेड झालेल्या शिक्षकाचे हृदय, दोन्ही किडन्या आणि यकृत (लिव्हर) या अवयवांचे दान करण्यात आले. बुधवारी शहरातील युनायटेड सिग्मा रुग्णालयात सहा तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर या हृदयाचे प्रत्यारोपण एका गरजू शेतकऱ्याच्या शरीरात करण्यात आले. मराठवाड्यात प्रथमच अशी शस्त्रक्रिया पार पाडून नवा इतिहास रचण्यात आला.
२९ जानेवारी रोजी झालेल्या दुचाकी अपघातात अनिल पंडित पाटील (४६) ब्रेन डेड झाले होते. कायगाव (ता.गंगापूर) येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. सिग्मा रुग्णालयातच नातेवाईकांनी त्यांचे अवयवदान करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) याची माहिती देण्यात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून अवयवदानाच्या प्रक्रिया सुरू झाली. अखेर याच रुग्णालयात हृदयरोगावर उपचार घेणाऱ्या एका ४४ वर्षीय गरजू शेतकऱ्याला बुधवारी अनिल यांचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले.
तसेच अनिल यांच्या यकृत आणि दोन किडन्यांमुळे अन्य तिघांच्या आयुष्याला नवी उभारी मिळाली. त्यांचे यकृत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात, तर एक किडनी शहरातील कमलनयन बजाज रुग्णालय आणि दुसरी किडनी माणिक रुग्णालयातील रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आली.
यकृत वेळेत पुण्यात पोहोचविण्यासाठी औरंगाबाद ते नेवासा आणि नेवासा ते पुणे असे ग्रीन कॉरिडोरचेही नियोजन क रण्यात आले होते. तसेच किडनी प्रत्यारोपण होणाऱ्या शहरातील दोन्ही रुग्णालयांपर्यंतही ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
डॉक्टरांचे अथक परिश्रम
सिग्मा ग्रुप आॅफ हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध पोटविकार शल्यचिकित्सक, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. उन्मेष टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ़ अजय रोटे, मुंबई येथील कार्डियाक सर्जन डॉ. अन्वय मुळे, सिग्मा हॉस्पिटलचे कार्डियाक सर्जन डॉ़ आनंद देवधर, डॉ़ बालाजी आसेगावकर, डॉ़ प्रमोद आपसिंगेकर, डॉ़ दीपक बोर्डे, डॉ़ सुजित खाडे, डॉ़ विनय दौंडे, डॉ़ अरुण चिंचोले, डॉ़ अभय महाजन, डॉ़ सचिन सोनी, डॉ़ गणेश बर्णेला, डॉ़ मनीषा टाकळकर, डॉ़ आशिष देशपांडे, डॉ़ शिरीष देशमुख, डॉ. राजकुमार घुमरे, डॉ़ विनोद शेटकर, मुंबई येथील डॉ़ विजय शेट्टी, डॉ़ निशा शेट्टी, पुणे येथील डॉ़ आरती गोखले, डॉ़ गौरव यांनी अथक परिश्रम घेत मराठवाड्यातील ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.