Babasaheb Purandare: ...अन् शिवशाहिरांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढून लेखकाच्या हातावर ठेवला!

By अमेय गोगटे | Published: November 15, 2021 12:24 PM2021-11-15T12:24:07+5:302021-11-15T12:24:37+5:30

Shivshahir Babasaheb Purandare: महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आज ईहलोकीची यात्रा संपवली आहे. पण, ९९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे भरभरून दिलंय, ते कायमच स्मरणात राहील.

heart touching and enriching memory of Shivshahir Babasaheb Purandare | Babasaheb Purandare: ...अन् शिवशाहिरांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढून लेखकाच्या हातावर ठेवला!

Babasaheb Purandare: ...अन् शिवशाहिरांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढून लेखकाच्या हातावर ठेवला!

Next

वर्ष २००७. रवींद्र नाट्यमंदिरात एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरचं पुस्तक. एका शिक्षकानं 'पॅशन' म्हणून वेळात वेळ काढून, पदरचे पैसे खर्च करून लिहिलेलं. प्रकाशझोतात न आलेले काही किल्ले, त्यांचा इतिहास शोधण्यासाठी लेखकाने बरीच खटपट केली होती. खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुस्तक प्रकाशनाला आले होते आणि त्यांच्यासोबत होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे. मी कार्यक्रम कव्हर करायला गेलो होतो. दोघंही उत्तम वक्ते असल्यानं, पुस्तक प्रकाशनाच्या 'जनरल' बातमीपेक्षा वेगळी काहीतरी मस्त बातमी मिळेल, अशी खात्री होती. पण, पुढे जे घडलं, तो माणूस म्हणून समृद्ध करणारा सोहळाच ठरला. 

प्रास्ताविक, लेखकाचं मनोगत वगैरे झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे ओघवत्या शैलीत बोलू लागले. लेखकाने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं. अचानक त्यांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढला आणि लेखकाला आपल्याजवळ बोलावून त्याच्या हातावर ठेवला. सभागृह स्तब्ध झालं होतं आणि शिक्षक-लेखकही भारावला होता - शहारला होता. या पुस्तकासाठी झालेल्या खर्चाचा भार शिक्षकावर पडू नये, ही शिवशाहिरांची भावना होती. सगळंच शब्दांच्या पलीकडचं होतं. अनेकांचे डोळे पाणावले होते. 

त्यानंतर, राज ठाकरे यांचं भाषण सुरू झालं आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. ''शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा गोफ अनमोल आहे. तो त्यांना परत करा आणि पुस्तकाचा जो काही खर्च झालाय तेवढ्या रकमेचा चेक माझ्या घरी येऊन घेऊन जा'', असा 'आदेशच' त्यांनी लेखकाला दिला आणि पुन्हा एकदा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

आज महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी ईहलोकीची यात्रा संपवली आहे. पण, ९९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे भरभरून दिलंय, ते कायमच स्मरणात राहील. शिवचरित्र जगभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतः अथक मेहनत केलीच, पण शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिलेदारांना शक्य तेवढी सगळी मदतही केली. त्यांच्या मनाचा मोठेपणा, औदार्य पाहता आलं, हे भाग्यच! 

त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव खरोखरच आठवत नाहीए. गुगलवर बरंच शोधलं, पण २००७ मध्ये आजच्यासारखा डिजिटल मीडिया नव्हता आणि स्मार्टफोनही. तेव्हा 'झी २४ तास' ही एकमेव मराठी वृत्तवाहिनी होती आणि त्यावर या व्हिडीओचं पॅकेज केलं होतं. पण, ते यू-ट्युबवर वगैरे अपलोड झालेलं नसल्यानं पुरावा म्हणून काही देता येत नाही. नंतर काय झालं, तो लेखक राज ठाकरेंना भेटला का, हेही माहीत नाही. पण, काही प्रसंग आपल्या मनावर कायमचे कोरले जातात, त्यापैकी हा एक आहे. शिवशाहिरांना मानाचा मुजरा!

Web Title: heart touching and enriching memory of Shivshahir Babasaheb Purandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.