प्रत्यारोपणासाठी हृदय पुण्याहून दोन तासांत मुंबईत

By admin | Published: August 4, 2015 01:59 AM2015-08-04T01:59:46+5:302015-08-04T02:01:57+5:30

मोठ्या संख्येने रस्त्यावर धावत असलेली वाहने आणि त्यातून वाट काढत एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी मुंबईकरांची चाललेली धडपड ही नेहमीचीच.

Heart for transplantation in Mumbai in two hours from Pune | प्रत्यारोपणासाठी हृदय पुण्याहून दोन तासांत मुंबईत

प्रत्यारोपणासाठी हृदय पुण्याहून दोन तासांत मुंबईत

Next

मुंबई : मोठ्या संख्येने रस्त्यावर धावत असलेली वाहने आणि त्यातून वाट काढत एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी मुंबईकरांची चाललेली धडपड ही नेहमीचीच. मात्र सोमवारी वाहतूक पोलीस तसेच डॉक्टरांचे नियोजन आणि मुंबईकरांचे स्पिरिट यामुळे एक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात होणाऱ्या या शस्त्रक्रियेसाठी मुंबई विमानतळापासूनचे
२० किमीचे अंतर अवघ्या १८ मिनिटांत
पार करण्यात आले. यासाठी वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवली.
बदलापूर येथील २२ वर्षीय तरुण प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. त्यासाठी पुण्यातील जहांगिर रुग्णालयातून एका ब्रेनडेड झालेल्या महिलेचे हृदय आणण्याचा निर्णय झाला. ही शस्त्रक्रिया तातडीने पार पाडणे आवश्यक असल्याने यासाठी फोर्टिस रुग्णालयाकडून मुंबई वाहतूक पोलिसांना कल्पना देण्यात आली आणि त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात आले.
जहांगिर रुग्णालयातून रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी हृदय घेऊन दुपारी २.३८च्या सुमारास निघाले आणि दुपारी २.४५ वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. नौदलाच्या विमानाने हे हृदय आणण्यात येत होते. दुपारी २.५५ वाजता विमानाने उड्डाण केल्यानंतर दुपारी ३.२० च्या सुमारास मुंबईतील देशांतर्गत विमानतळावर ते उतरले. विमानतळाबाहेर ३.३० वाजता बाहेर येताच रुग्णवाहिकेने हृदय फोर्टिस रुग्णालयात नेण्यात येणार असल्याने वाहतूक पोलिस सज्ज होते. विमानतळ ते फोर्टिस रुग्णालय असा २० किमी अंतराचा प्रवास असल्याने ते पार करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काटेकोर नियोजन आधीच केले होते. वाहतूक नियोजित रस्त्यांवरुनच रुग्णवाहिका नेण्यात येणार असल्याने सोबत एक वाहतूक पोलिसांची गाडी देण्यात आली. तसेच बाईकस्वार वाहतूक पोलिसही देण्यात आले. विशेष म्हणजे विमानतळ ते रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक जंक्शनजवळ वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले. यासाठी ५० पेक्षा जास्त वाहतूक पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. साधारणपणे दुपारी ३.३० च्या सुमारास रुग्णवाहिका विमानतळ परिसरातून वाहतूक पोलिसांच्या ताफ्यासह बाहेर पडली. यात प्रत्येक मार्गावर आणि जंक्शनवर वाहतूक पोलीस वाहन चालकांना थांबण्याच्या सूचना करत होते आणि त्याला वाहन चालकही साथ देत होते. अशातऱ्हेने अवघ्या १८ मिनिटांत ही रुग्णवाहिका फोर्टिस रुग्णालयात दाखल झाली आणि त्यानंतर पुढील काही मिनिटांत शस्त्रक्रिया सुरु झाली, आणि ती यशस्वीरित्या पार पडली.


......................................
मुंबईकरांचेही स्पिरीट
आम्हाला याबाबात साधारपणे अकराच्या सुमारास माहिती देण्यात आली. एवढ्या कमी कालावधीत वाहतुकीचे नियोजन करणे हे आमच्यासमोर आव्हान होते. तरीही यशस्वीरित्या नियोजन करुन २० किमीचे अंतर आम्ही १८ मिनिटांत पार केले. या शस्त्रक्रियेसाठी ग्रीन कॉरिडोरसारखी संकल्पना मुंबई वाहतूक पोलिसांनी पहिल्यांदाच राबवली. मुंबईकरांनीही त्याला मदत केली.
- मिलिंद भारांबे, सहपोलिस आयुक्त, वाहतूक
...............................

 

Web Title: Heart for transplantation in Mumbai in two hours from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.