हृदयद्रावक! मराठा आरक्षणासाठी तीन मुलांच्या पित्याने मृत्यूला कवटाळले, खिशामध्ये आढळली चिठ्ठी...
By बाबुराव चव्हाण | Published: October 25, 2023 09:23 PM2023-10-25T21:23:44+5:302023-10-25T21:25:22+5:30
Maratha Reservation: ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असा मजकूर असलेली चिठ्ठी खिशात ठेवून तीन मुलांच्या पित्याने शेतातील झाडाला दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
ईट (धाराशिव) - ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असा मजकूर असलेली चिठ्ठी खिशात ठेवून तीन मुलांच्या पित्याने शेतातील झाडाला दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना २५ ऑक्टाेबर राेजी दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास भूम तालुक्यातील निपाणी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच गावात मराठा बांधवांनी माेठी गर्दी केली.
निपाणी येथील प्रवीण काकासाहेब घाेडके (३६) हे शेती करीत. त्यांना दाेन मुले आणि एक मुलगी, अशी तीन अपत्ये आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या लढ्यात ते सक्रिय असायचे. यावेळी नक्की अरक्षण मिळेल, असे ते म्हणायचे. मात्र, सरकारने मागवून घेतलेल्या तीस दिवसांच्या मुदतीनंतरही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे प्रवीण घाेडके हताश झाले हाेते. यातून आलेल्या नैराश्यातूनच त्यांनी बुधवारी दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली, असे ग्रामस्थ संदीपान घाेडके, रघुनाथ घाेडके यांनी सांगितले.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेत पंचनामा केला. यावेळी मयत घाेडके यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. ‘त्या’ चिठ्ठीत ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असा मजकूर आहे. दरम्यान, चिठ्ठीतील उर्वरित मजकूर सांगण्यास पाेलिसांनी नकार दिला. ईट येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून वाशी पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली. या घटनेमुळे निपाणीसह ईट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.