हृदयदावक! बळीराजानं औताला जुंपलं नातू आणि मुलाला
By Admin | Published: June 25, 2017 07:16 AM2017-06-25T07:16:22+5:302017-06-25T07:16:22+5:30
शेतकामासाठी बैजजोडी नसल्याने एका शेतक-यावर स्वत:च्या मुलाला आणि नातवाला औताला जुंपण्याची वेळ आल्याची
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 25 - राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानंतर बळीराजाने शेतीच्या मशागतीचं काम सुरु केलं आहे. शेतकामासाठी बैजजोडी नसल्याने जळगावात एका शेतक-यावर स्वत:च्या मुलाला आणि नातवाला औताला जुंपण्याची वेळ आल्याची धक्कादायक आणि हृदयदावक घटना समोर आली आहे. गरीबीमुळे बैलजोडी खरेदी करणे आणि पाळणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे शेत जमिनीच्या मशागतीची कामं त्यांचा मुलगा आणि नातू करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने अनेकांचे काळीज पिळवटळे आहे. त्यामुळे सरकारनं काल कर्जमाफी केली असली तरी त्यातून शेतकऱ्यांचा प्रश्न खरचं सुटला का असा प्रश्न उभा राहतोय.
जळगावजिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील निंभोरा गावातील हिरामण पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्यावर आपल्या नातवाला आणि मुलाला औताला जुंपण्याची वेळ आली आहे. या तिघांचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
हिरामण पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित असलेल्या दीड एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी कापसाची लागवड केली आहे. मात्र अल्पभूधारक खातेदार असल्याने त्यांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. परिणामी मशागतीसाठी लागणारी बैलजोडी पाळणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे हिरामण स्वतःच्या काळजावर दगड ठेवून बैलांऐवजी मुलगा आणि नातवंडाला औताला जुंपून शेतीच्या मशागतीची कामे करत आहेत. एवढेच नव्हे तर इतर शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करून पाटील कुटुंब घरची शेती कसतात.
दरम्यान, कर्जाला आणि सततच्या नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी सध्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना दिसत आहे. परंतू असे असताना पाटील मात्र जगण्यासाठी शेतीत घाम गाळत आहे. त्यांची ही बाब कौतुकास्पद असल्याने त्याची नोंद ठेवणे गरजेचे आहे.