Heat Wave: आजपासून पुन्हा सूर्य आग ओकणार; पाच दिवस झळा कायम, सावध रहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 06:19 AM2022-05-09T06:19:15+5:302022-05-09T06:19:24+5:30
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत पाऱ्याची झळ किंचित कमी झाली असली तरीदेखील राज्य उन्हाने होरपळत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऱ्याने घाम फोडला असून, बहुतांशी शहरांचे कमाल तापमान चाळिशीपार नोंदविण्यात येत आहे. मुंबईचे कमाल तापमान सरासरी ३४ अंश नोंदविण्यात येत असले तरी कायम असलेल्या उकाड्याने त्रासात भर घातली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. पुढील चार ते पाच दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
९ मे : उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
१० ते १२ मे : कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
----------
तापलेली शहरे
नांदेड ४१.२
परभणी ४१.३
सोलापूर ४१.८
उस्मानाबाद ४२.३
अकोला ४४.४
अमरावती ४४
बुलडाणा ४१.५
ब्रहमपुरी ४४.९
चंद्रपूर ४४.२
गडचिरोली ४२.८
गोंदिया ४२.८
नागपूर ४३
वर्धा ४४.२
वाशिम ४२.५