उष्णतेने होरपळतोय महाराष्ट्र; उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 11:51 AM2022-05-06T11:51:25+5:302022-05-06T11:51:45+5:30
येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा.
मुंबई : राज्यात उष्णतेच्या लाटेने कहर केला असताना येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमानाने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे. तत्पूर्वी कमाल तापमान ३६ ते ३८ अंश नोंदविण्यात येत होते. कमाल तापमानात किंचित घसरण झाली असली तरी मुंबईत उकाडा कायम आहे.
‘अवकाळी’चे वातावरण निवळले, पारा वाढणार
संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता जाणवते. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, नगर, अकोला, संगमनेर, शहापूर, जव्हार, मोखाडा तालुक्यातील क्षेत्रात तुरळक ठिकाणी पुढील ४-५ दिवस उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती जाणवू शकते.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
पुढील पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ७ ते ९ मेदरम्यान राजस्थानात उष्णतेची लाट येईल. ८ ते ९ मे दरम्यान दक्षिण हरियाणा- दिल्ली, दक्षिण - पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची लाट येईल.
कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग