उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:30 AM2022-05-05T07:30:37+5:302022-05-05T07:32:03+5:30
बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३८ ते ४४ अंशावर
मुंबई : उष्णतेच्या लाटेने उत्तर भारत गारद झाला असतानाच महाराष्ट्राला देखील याच्या वरचेवर झळा बसत आहेत. यामुळे बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३८ ते ४४ अंशावर दाखल झाले असून, आता हवामान खात्याने विदर्भासह उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा दिल्याने पाऱ्याची धग आणखी वाढणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. मुंबईचे तापमान ३४ अंशाच्या आसपास असून, आर्द्रतेमधील वाढीमुळे उकाड्यात भर पडत असून, मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त आहेत.
- ५ मे : कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील.
- ६, ७ आणि ८ मे : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील.
५ ते ८ मे दरम्यान विदर्भात तर ५ मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. पश्चिम राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये ६ ते ८ मे दरम्यान तर पूर्व राजस्थानात ७ ते ८ मे दरम्यान उष्णतेची लाट राहील.
कृष्णानंद होसाळीकर,
अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग