राज्यात उष्णतेचा कहर कायम, यवतमाळमध्ये उष्माघाताचे दोन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 03:44 AM2019-05-02T03:44:45+5:302019-05-02T03:44:58+5:30
राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघाताने यवतमाळमध्ये दोघांचा बळी गेला आहे.
यवतमाळ : राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघातानेयवतमाळमध्ये दोघांचा बळी गेला आहे. आर्णी तालुक्यातील कल्पना शिंदे या उपवर मुलीचा उपचरादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. तर येथील वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह बुधवारी आढळून आला.
आर्णी तालुक्यातील भंडारी (जहागीर) येथील रघुनाथ शिंदे यांची मुलगी कल्पना हिचा विवाह ठरल्याने परंपरेप्रमाणे देवदर्शनासाठी गेले होते. त्या वेळी प्रवासादरम्यान कल्पनाला उलट्या होऊ लागल्याने तुळजापूर येथे उपचार घेऊन तिने कुटुंबीयांसोबत पुढचा प्रवास सुरू केला. त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला नांदेड येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान ३० एप्रिलला तिचा मृत्यू झाला. देवदर्शनाला गेलेल्या उपवर मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दुसऱ्या घटनेत वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सिंगलदीप गावाजवळ १ मे रोजी सकाळी एका व्यक्तीला महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनासाठी पाठविला आहे. उष्माघातानेच या महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.