विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 02:40 AM2019-04-30T02:40:39+5:302019-04-30T02:40:51+5:30
विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आली असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे.
पुणे : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आली असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्रात गेले तीन दिवस आलेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता सोमवारी काहीशी कमी झाली़ मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ४३ - ४४ अंशावर गेलेल्या कमाल तापमानात सोमवारी घट नोंदविली गेली. राज्यात अकोला येथे सर्वाधिक कमाल तापमान ४६़९ अंश नोंद झाले. सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे ३४ अंश होते. दक्षिण व मध्य महाराष्ट्रात गेले तीन दिवस उष्णतेने नागरिक हैराण झाले होते़ सोमवारी या भागातील कमाल तापमानात काहीशी घट झाल्याने लोकांना थोडासा दिलासा मिळाला. उत्तर महाराष्ट्रात मात्र अजूनही सूर्यनारायण कोपलाच असून मंगळवारीही येथे उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
विदर्भात ३० एप्रिल रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ मंगळवारी विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. नागपुरात शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. नागपुरात पारा ४५ वर पोहचला आहे. हवामान खात्याने आठवडाभर उष्णतेची लाट जिल्ह्यात राहील, असा अंदाज वर्तविला आहे. त्याचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला असून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अतिरिक्त वर्ग किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत आटोपण्याचे आदेश आहेत
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ४०.२, लोहगाव ४१.६, जळगाव ४५.२, कोल्हापूर ३७.२, महाबळेश्वर ३४, मालेगाव ४३.२, नाशिक ३९.२, सांगली ३९.२, सातारा ४०.६, सोलापूर ४३.३, मुंबई ३३.२, अलिबाग ३५.४, रत्नागिरी ३३.३, डहाणू ३७.३, उस्मानाबाद ४३.३, परभणी ४५.८, नांदेड ४४.५, बीड ४४.४, अकोला ४६.९, अमरावती ४६.८, बुलढाणा ४३.५, चंद्रपूर ४६.६, गोंदिया ४३, नागपूर ४४.८, वाशिम ४५, वर्धा ४५.८, यवतमाळ ४५.५़