विदर्भात उष्णतेची लाट; मुंबईचा पारा जाणार ३५ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:05 AM2019-04-24T06:05:48+5:302019-04-24T06:05:58+5:30
हवामानात सातात्याने बदल नोंदविण्यात येत असतानाच हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने तापत असतानाच आता मुंबईच्या कमाल तापमानातही चढ-उतार नोंदविण्यात येत असून, वाढता उकाडा यात भर घालत आहे. हवामानात सातात्याने बदल नोंदविण्यात येत असतानाच हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत. मध्यंतरी झालेल्या अवेळी पावसामुळे येथील कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली होती. मात्र आता पुन्हा हवामान कोरडे झाल्याने कमाल तापमानाने कहर केला आहे. विशेषत: मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत असतानाच राज्यात अधिकाधिक शहरांचे कमाल तापमान ३८ ते ४० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत होते.
दरम्यान, मुंबईत बुधवारसह गुरुवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
राज्याचा अंदाज
२४ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
२५ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
२६ ते २७ एप्रिल : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
मंगळवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला ४३.४, अमरावती ४२.६, औरंगाबाद ४०.२, बीड ४२.१, बुलडाणा ४०.६, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४१, जळगाव ४२.२, जेऊर ४०, मालेगाव ४२.८, मुंबई ३४.८, नागपूर ४२.५, नाशिक ४०.१, उस्मानाबाद ४०.९, परभणी ४३.२, पुणे ४०.३, सातारा ४०.१, सोलापूर ४१.३, ठाणे ४१.२, वर्धा ४३.८, यवतमाळ ४२.२.