पुढचे चार दिवस राज्यात येणार उष्णतेची लाट; बंगाल-ओडिशामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:44 AM2024-04-26T10:44:17+5:302024-04-26T10:44:40+5:30
राज्यात व मध्य भारतात पुढच्या ४ ते ५ दिवसांत कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई - आखाती देशातून गुजरातमार्गे मुंबईसह राज्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट येईल आणि कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी अधिक नोंदविले जाईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. त्यानुसार, मुंबईचे कमाल तापमान ३८ च्या आसपास, तर राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार नोंदविले जाण्याची शक्यता आहे.
बंगाल-ओडिशामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट
• लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होत असताना, हवामान विभागाने अनेक राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे मतदानासाठी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
• भारतीय हवामान विभागाकडून पाच दिवसांसाठी पश्चिम बंगाल व ओडिशात उष्णतेचा रेड अलर्ट, तर बिहार व कर्नाटकमध्ये ऑरेंज अलर्ट दिला.
हवामानातील बदलामुळे कमाल तापमानाचा पारा वाढतो आहे. तीन दिवस उष्णतेच्या लाटेच्या झळा बसतील. मुंबईचे कमाल तापमान ३८ च्या आसपास नोंदविले जाईल. - प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई सुनील कांबळे, प्रमुख,
राज्यात व मध्य भारतात पुढच्या ४ ते ५ दिवसांत कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे. - डॉ. कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, भारतीय हवामान विभाग, पुणे