मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी ओलाचं बिल ८३ हजार
By admin | Published: September 7, 2016 04:10 PM2016-09-07T16:10:19+5:302016-09-07T16:10:19+5:30
मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी एका प्रवाशाला ओला टॅक्सीसेवेने ८३,३९५ रुपयाचे बिल आकाराल्याची घटना समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - ओला टॅक्सीने फक्त ४५० किमीच्या प्रवासासाठी हैदराबादमधील एका प्रवाशाला ९ लाखाचं बिल आकारल्याची घटना ताजी असताना आता मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी एका प्रवाशाला ओला टॅक्सीसेवेने ८३,३९५ रुपयाचे बिल आकाराल्याची घटना समोर आली आहे.
घाटकोपर पंतनगरमध्ये रहाणारे व्यावसायिक कमल भाटिया यांनी ४ सप्टेंबरला पुण्याला एका लग्नसोहळयाला जाण्यासाठी ओला टॅक्सी बुक केली होती. भाटिया यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन मुली सुद्धा होत्या. सकाळी ६.३० वाजता त्यांनी घर सोडले व रात्री ९.२५ वाजता ते घाटकोपरमधल्या आपल्या घरी पोहोचले.
आणखी वाचा
टॅक्सीमधून उतरताना चालकाने त्यांच्या हाती ८३,३९५ रुपयांचे बिल दिले. ते पाहून भाटिया काही क्षणांसाठी चक्रावून गेले. त्यावर १४ तासात तुम्ही ५०० किमीच्या वेगाने ७ हजार किलोमीटरचा प्रवास केला असे नमूद केले होते. बिलाची रक्कम पाहून आपण पुण्याला जाण्यासाठी विमान बुक केले होते की, काय असे कमल भाटियांना वाटले.
ओला टॅक्सीच्या सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे भाटिया यांना इतक्या रक्कमेचे बिल आले. काहीवेळासाठी त्यांचा चालकाबरोबर वाद झाला. चालकानेही चूक मान्य केली. कॉलसेंटरमधल्या कर्मचा-याबरोबर चर्चा केल्यानंतर अखेर ३४७ किमीच्या प्रवासासाठी त्यांनी ४, ०८८ रुपये बिल भरले व चालकाला १०० रुपये टिप दिली.