जळगावात दोन कंपन्यांमध्ये भीषण आग
By admin | Published: June 21, 2016 04:22 PM2016-06-21T16:22:17+5:302016-06-21T16:22:38+5:30
औद्योगिक वसाहतीच्या इ-सेक्टरमध्ये असलेल्या ओमसाई एंटरप्रायजेस व तुलसी पॉलिमर या दोन्ही कंपन्यांना २१ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.२१ - औद्योगिक वसाहतीच्या इ-सेक्टरमध्ये असलेल्या ओमसाई एंटरप्रायजेस व तुलसी पॉलिमर या दोन्ही कंपन्यांना २१ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत दोन्ही कंपन्यांमधील यंत्रसामग्री, कच्चा व तयार माल जळून खाक झाल्याने सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
इ-सेक्टरमधील प्लॉट क्रमांक २८/१ मध्ये अंकीत अखिलेश गंगराळे (रा.जळगाव) यांची ओमसाई एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. या कंपनीत जेवणासाठी लागणारी प्लास्टिक व कागदाची पत्रावळी, द्रोण व ग्लास तयार केले जातात. खासगी कामानिमित्ताने मंगळवारी गंगराळे यांनी कंपनी बंद ठेवली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. कंपनीचे शटर बंद असताना आतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे पाहून आजूबाजूच्या कंपन्यांमधील लोकांना आग लागल्याचे समजले. त्यांनी लागलीच अंकीत गंगराळे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने गंगराळे हे त्यांच्या मित्रांसह घटनास्थळी दाखल झाले.