धुळे जिल्हा बँकेला भीषण आग

By admin | Published: April 18, 2016 01:27 AM2016-04-18T01:27:59+5:302016-04-18T01:27:59+5:30

येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहामजली प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर रविवारी सकाळी भीषण आग लागली़ त्यात तिसऱ्या मजल्यावरील

Heavy fires in Dhule district bank | धुळे जिल्हा बँकेला भीषण आग

धुळे जिल्हा बँकेला भीषण आग

Next

धुळे : येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहामजली प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर रविवारी सकाळी भीषण आग लागली़ त्यात तिसऱ्या मजल्यावरील प्रशासकीय कार्यालयासह, चौथ्या, पाचव्या मजल्यावरील साहित्य आणि सहाव्या मजल्यावरील विश्रामगृहही जळून खाक झाले आहे.
सकाळी आठ वाजता आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर धुळे, शिरपूर, दोंडाईचा, मालेगाव, पारोळा, अमळनेर येथून १२ अग्निशमन दलाच्या बंबांनी तब्बल ७५ फेऱ्या मारून दुपारी एक वाजता ती आटोक्यात आली़ सुट्टीचा दिवस असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. कुणी जखमी झाल्याचेही वृत्त नाही. तिसऱ्या मजल्यावरील आग विझविण्यासाठी शिडी नसल्याने खालूनच पाण्याचा मारा सुरू करण्यात आला़ मात्र, आग भडकून इतर मजल्यांवरही पसरली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बँकेचे रेकॉर्ड ‘आॅनलाइन’ असून, ते नाशिक येथील ‘डिझास्टर सेव्हिंग साइट’वर सुरक्षित आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी दिली आहे.
बँकेच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ९० शाखांमध्ये सोमवारी व्यवहार सुरळीत सुरू होतील. बँकेच्या साहित्यासह सर्व मालमत्तेचा विमा काढलेला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली.
आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले असून, पंचनामा सुरू आहे. धुळे शहराचे आ. अनिल गोटे यांनी मात्र, आगीमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. बँकेतील भ्रष्टाचाराप्रकरणी अनेक अधिकारी, पदाधिकारी, तसेच आजी-माजी अध्यक्षांवर गुन्हे दाखल असून चौकशी पूर्ण झाली आहे. लवकरच त्यांची तुरुंगात रवानगी होणार असल्याची चाहूल लागल्याने पुराव्याचे कागदपत्र नष्ट करण्यासाठी आग लावली, असा आरोप गोटे यांनी केला आहे.आगीची सीआयडी, तसेच स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

बँकेला लागलेली आग हा एक अपघात आहे. कुणी न्यायदेवतेपेक्षाही स्वत:ला मोठे समजून आरोप करीत असतील, तर त्याबद्दल काहीच बोलणार नाही. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमातील स्टेजला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग लावली होती, असेही म्हणता येईल.
- राजवर्धन कदमबांडे, अध्यक्ष, धुळे-नंदुरबार जिल्हा बँक

Web Title: Heavy fires in Dhule district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.