मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, 'या' गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 12:21 PM2019-08-05T12:21:57+5:302019-08-05T12:34:21+5:30
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे.
मुंबई - मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे. पुढचे 24 तास कोकण रेल्वेही बंद असणार आहे. तसेच मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ बंद केली आहे. कोकण रेल्वेने ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
कोकण रेल्वेची वाहतूक काही वेळ बंद झाली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने पुढील 24 तासांसाठी हा निर्णय घेतला. कोकण रेल्वे मार्गावरील 9 एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 7 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (5 ऑगस्ट) तुतारी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर, डबल डेकर, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगला एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर काही गाड्या उशिराने धावत आहेत.
Due to heavy rainfall, water logging and boulder fall between Apta - Jite section over Central Railway, the following trains have been Cancelled/Short terminated/Diverted/Rescheduled. #MumbaiRainsLiveUpdates@RailMinIndia@Central_Railway@GMSRailway@SWRRLY@WesternRlypic.twitter.com/1XMZfB0YFZ
— Konkan Railway Corp (@KonkanRailway) August 5, 2019
कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर येथून सुटतात. मात्र मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. मडगाव-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस रविवारी (4 ऑगस्ट) पेण आणि पनवेलदरम्यान अडकली होती. या एक्स्पेसच्या पुढे आणि मागे दरड कोसळल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने बराच वेळ ही एक्स्प्रेस पेण आणि पनवेलदरम्यान अडकली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले . एक्स्प्रेस खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. तसेच कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
Long distance trains update pic.twitter.com/KYQ30qx3Ee
— Central Railway (@Central_Railway) August 5, 2019
मुंबई येथे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी विस्कळीत झाली होती. मनमाडकरांसह चाकरमान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेससह मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आली. यामुळे दैनंदिन कामकाजासाठी नाशिक, मुंबई येथे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. मुंबई येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुंबई-हैदराबाद सुफरफास्ट एक्स्प्रेस, दादर-चैन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई-बिदर एक्स्प्रेस मनमाड, इगतपुरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत.
मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी ठप्प झाली. त्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले. काही गाड्यांना विविध स्थानकांवर थांबवून ठेवाव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. दरम्यान, सोमवारीही काही गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
सोमवारी रद्द केलेल्या रेल्वेगाड्या
- मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
- मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस
- मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर
- मनमाड-मुंबई-मनमाड एक्सप्रेस
- भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस
- मुंबई-कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस
- पुणे-बिलासपुर एक्सप्रेस
- एलटीटी-हातिया एक्सप्रेस
रत्नागिरी जिल्ह्याला पाऊस व वादळी वाऱ्यांनी दणका दिला. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने या मार्गावरील वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. कशेडी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावरील वाहतूक विन्हेरे, मंडणगड मार्गे वळवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवबाग गावाला सागरी अतिक्रमणाचा तडाखा बसला आहे. कर्ली खाडीपात्राचे पाणी गावात घुसले. समुद्राला आलेल्या उधाणामुळे देवबागमधील ख्रिश्चनवाडी, मोबारवाडीला फटका बसला. माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसामुळे आंबेरी निर्मला नदीला पूर आला. त्यामुळे सायंकाळपर्यंत परिसरातील 27 गावांचा संपर्क तुटला. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून त्यामुळे ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.