रविवारच्या सुटीला आनंदसरींची सोबत! अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:52 AM2020-06-14T04:52:09+5:302020-06-14T06:53:34+5:30
सिंधुदुर्गमध्ये झाली अतिवृष्टी; मराठवाडा, विदर्भातही कोसळल्या दमदार सरी
पुणे : राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने शनिवारी कोकणातून नगर, मराठवाड्यातील काही भागांतून विदर्भातील गोंदियापर्यंत मजल मारली आहे. येत्या २४ तासांत तो पुणे, मुंबईसह राज्याचा उर्वरित भाग व्यापण्याची शक्यता असून, कोकणासह मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रविवारच्या सुटीला आनंदसरींची सोबत लाभणार आहे. शनिवारी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २२५ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली.
संततधार पावसाने नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. विशेष म्हणजे, दुष्काळी मालेगाव, बागलाण, देवळा व सिन्नर तालुक्यात पावसाने जूनची सरासरीदेखील ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातही काही ठिकाणी सरी कोसळल्या.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राबरोबरच देशातील छत्तीसगडचा आणखी काही भाग, ओडिशा व प. बंगालचा उर्वरित भाग, तसेच झारखंडचा बहुतांश भाग आणि बिहारच्या काही भाग व्यापला आहे. येत्या २४ तासांत पुणे, मुंबईसह राज्यातील उर्वरित भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहार, दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात १४ जून रोजी, तर पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १६ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पाणी सोडले
शुक्रवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वर व धरण परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. दारणा धरण क्षेत्रातील पाणीही थेट नदीत येऊन मिसळल्याने गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत पावसाने हजेरी लावली.
14 जून रोजी मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे़
15, 16 जून रोजी कोकणासह पालघर, ठाणे, मुंबईत मुसळधारेची शक्यता आहे. १६ जून रोजी पुणे जिल्ह्यात घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला.
मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल : मान्सून रविवारी मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भागांत तसेच दक्षिण गुजरातमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर व उपनगरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. रात्री मात्र पावसाच्या सरी अनेक भागांत बरसल्या.