आजपासून 'तो' पुन्हा मेघगर्जनेसह कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 12:57 PM2022-10-01T12:57:04+5:302022-10-01T12:57:20+5:30
पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईतही काही भागांत हलक्या, तर काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सध्या परतीच्या पावसाचा वेग वाढला आहे. परतीचा पाऊस आता राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झाला आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर याच काळात देशात १०६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. १ आणि २ ऑक्टोबरला कोकणासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. सोबत मराठवाड्यात विजाही कडाडतील.
३ ऑक्टोबरला पावसाचा जोर किंचित कमी होईल. कोकण आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले.