मुंबईसह कोकणात दमदार पाऊस

By admin | Published: June 22, 2016 04:33 AM2016-06-22T04:33:12+5:302016-06-22T04:33:12+5:30

मान्सूनने अवघा महाराष्ट्र व्यापला असून मंगळवारी दिवसभरात मुंबईसह कोकणात दमदार पाऊस झाला. गोव्यात तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Heavy rain in Kokan with Mumbai | मुंबईसह कोकणात दमदार पाऊस

मुंबईसह कोकणात दमदार पाऊस

Next

पुणे : मान्सूनने अवघा महाराष्ट्र व्यापला असून मंगळवारी दिवसभरात मुंबईसह कोकणात दमदार पाऊस झाला. गोव्यात तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खान्देशातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला असून वीज पडून सहा
जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या
२४ तासांत कोकणात जोरदार
पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे़
मंगळवारी राज्यात सर्वाधिक पाऊस डहाणू (जि. पालघर) येथे ११६ मिमी झाला़ ठाणे ११३, मुंबई, काणकोण ११० मिमी, भांडुप, मार्मागोवा, मुरगाव येथे प्रत्येकी १०० मिमी पावसाची नोंद झाली़ नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, शेवगाव आदी परिसरात दमदार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगलीत चांगला पाऊस झाला. पुणेकरांनाही पाऊस सुखावून गेला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ (प्रतिनिधी)

खान्देशात वीज पडून सहा जणांचा मृत्यू
खान्देशात वीज पडून सहा जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये दोन बालिकांचा समावेश आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यात दोन म्हशीसुद्धा ठार झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील धनराज श्रावण कडाळे (५०), शीतल पोपट बागुल (१२), नंदुरबार जिल्ह्यातील प्रमिला वीरसिंग वळवी (१४) आणि जळगाव जिल्ह्यातील लिलाबाई त्र्यंबक पवार , मंगेश मधुकर महाजन (२०) आणि कैलास बंडू चौधरी (३०) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
काश्मीरमध्ये मान्सून
मान्सूनच्या पश्चिम शाखेची वाटचाल झाली नसली तरी उत्तर शाखेने वेळेआधी जोरदार मुसंडी मारत थेट काश्मीरपर्यंत धडक मारली असून संपूर्ण महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, पूर्व उत्तर प्रदेश, संपूर्ण जम्मू काश्मीर व पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग व्यापला आहे़

Web Title: Heavy rain in Kokan with Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.