अवघे कोकण पाण्याखाली! ठाणे, रायगड, पालघरमध्ये पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 06:33 AM2018-07-08T06:33:21+5:302018-07-08T06:33:44+5:30

उपराजधानी नागपूरसह विदर्भात शुक्रवारी गोंधळ घालणाऱ्या पावसाने शनिवारी तिथे विश्रांती घेतली. मात्र, या पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला.

Heavy rain in Konkan! Flooding in Thane, Raigad, Palghar | अवघे कोकण पाण्याखाली! ठाणे, रायगड, पालघरमध्ये पूरस्थिती

अवघे कोकण पाण्याखाली! ठाणे, रायगड, पालघरमध्ये पूरस्थिती

googlenewsNext

मुंबई : उपराजधानी नागपूरसह विदर्भात शुक्रवारी गोंधळ घालणाऱ्या पावसाने शनिवारी तिथे विश्रांती घेतली. मात्र, या पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. येथील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, काहींना तर पूर आला आहे.
रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना पावसाने झोडपले. रायगडमध्ये सावित्री नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण महाड शहरात व तेथील बाजारपेठेमध्ये पाणी शिरले होते. जगबुडी नदीचे पाणी कळंबणी (ता. खेड) येथे आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. रेल्वेसेवेलाही ब्रेक लागला. वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या १२0 पैकी ९७ पर्यटकांची सुटका करण्यात आली. वसईचा पट्टाही पाण्याखालीच आहे. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत महाडमध्ये २०५ मि.मी. पाऊस झाला. सावित्री नदीला पूर आला असून, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा भरून वाहत आहेत. रसायनी-आपटा, पाली-खोपोली रोहा-नागोठणे रोड या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. उल्हास, गाढी या नद्या, तसेच भिरा धरण क्षेत्रातील गावे, वाड्या-वस्त्यांना सतर्कतेचा इशारा आहे.

ठाणे जिल्ह्यात विक्रमी पाऊस
ठाणे जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला. भिवंडी, मुरबाड, मुंब्रा, उल्हासनगर येथील सखल भागांत पाणी साचल्याने अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंब्रा, दिवा परिसरांतील ठिकठिकाणच्या चाळीतील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले.
वासिंद परिसरातील ४२ गावांचा ठिकठिकाणच्या नदीनाल्यांच्या पुरामुळे संपर्क तुटला आहे. भातसा, तानसा, मुरबाडी, कामवारी, उल्हास, वालधुनी या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. कल्याण-नगर आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

उल्हास नदीच्या पुराचे पाणी रायता पुलावरून वाहू लागल्यामुळे तो दुपारी १२.३० वाजता वाहतुकीस बंद करावा लागला.
यामुळे कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक दीर्घकाळ खोळंबली. माळशेज घाटातही धुके वाढले आहे. यामुळे या घाटातील वाहतूकही धिम्या गतीने होत आहे.

९७ जणांची सुखरूप सुटका
वसईतील धोकादायक असलेल्या चिंचोटी धबधब्याच्या परिसरात १२0 पर्यटक अडकून पडले होते. त्यापैकी ९७ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, भावेश गुप्ता (३५) या पर्यटकाचा मृत्यू झाला. इतरांना सोडविण्याचे काम सुरू आहे. हे सर्व पर्यटक मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांतून पर्यटनासाठी येथे आल्याची माहिती वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.

जगबुडीवरील पूल धोकादायक.
मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदीवर असलेला पूल ब्रिटिशकालीन आहे. सध्या हा पूल इतका धोकादायक आहे की, त्यावरून वाहन गेले की तो हलतो. तरीही त्या पुलावरून वाहतूक सुरू असते.
येत्या २४ तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

नांदेड, हिंगोलीत जोर :
मराठवाड्यात नांदेड व हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर होता. किनवट तालुक्यात वीज पडून एक आदिवासी गरोदर महिला मृत्युमुखी पडली.

मुंबईकरांचे हाल कायमच
या पावसामुळे कल्याण ते बदलापूर रेल्वे मार्ग काही तासांसाठी बंद करण्यात आला. तिथे रेल्वे रुळांवरही पाणी साचले होते. सतत कोसळणारा पाऊ स व रस्त्यांवर पडलेले खड्डे, तसेच ठिकठिकाणी मेट्रो रेल्वेची सुरू असलेली कामे यामुळे रस्त्यांवरील वाहतूक पुरती मंदावली होती.

मुंबईतही जोर‘धार’
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. उपनगराच्या तुलनेत मुंबई शहरात मात्र पावसाचा जोर कमी होता.पावसामुळे लोकल सेवेला लेटमार्क लागला. मानखुर्दमध्ये शॉर्टसर्किटमुळे एका महिलेचा मृत्यू झाला.

कर्जत व पनवेल मार्गावरील रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेसेवेचा खोळंबली होती तर विठ्ठलवाडी येथील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जत ते कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूकदेखील काही काळ ठप्प झाली होती.

मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेची सेवा बंद पडली नाही. मात्र, तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक विलंबाने सुरू होती, पण शनिवार असल्याने लोकांचे हाल झाले नाहीत.

Web Title: Heavy rain in Konkan! Flooding in Thane, Raigad, Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.