कोकणात दमदार, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग काही काळ ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:43 AM2018-06-11T05:43:34+5:302018-06-11T05:43:34+5:30
कोकणात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी पावसाचा जोर होता. पावसाने सिंधुदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.
मुंबई/पुणे - कोकणात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी पावसाचा जोर होता. पावसाने सिंधुदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.
पुढील २४ तासांत दक्षिण कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़
पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर झाडांची पडझड झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कणकवली बाजारपेठेतील दुकानांत गटाराचे पाणी घुसले. त्यामुळे व्यापाºयांचे नुकसान झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाले आहेत. राजापूर शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा, चिपळूण तालुक्यातील कापसाळ, खेड तालुक्यातील लोटेमाळ येथे वाहतूक ठप्प झाली होती.
मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत होते. बीड जिल्ह्यात नेकनूर मंडळात दोन तर पाली मंडळात दीड इंच पाऊस झाला. अंबाजोगाई, गेवराई, वडवणी, केज येथेही पावसाची नोंद झाली. परभणीतही पाऊस झाला.
रेणापूर (जि. लातूर) तालुक्यात शनिवारी दुपारी रेणा नदीला जोडणाºया ओढ्याला पूर आल्याने त्यात बाळासाहेब पांडुरंग पवार हे वाहून गेले होते़ त्यांचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला.
मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून पुढील काहीदिवस अतिवृष्टी कायम राहणार आहे.
कोल्हापुरला दमदार
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा सकाळी जोर कायम होता. दिवसभर पावसाची भुरभुर सुरूच होती.
विदर्भाच्या वेशीवर!
मान्सून विदर्भाच्या वेशीवर पोहोचला असून यवतमाळ व ब्रह्मपुरी येथे पाऊस झाला. मान्सून एक-दोन दिवसांत संपूर्ण विदर्भ व्यापेल. विदर्भातील भंडारा, कुही, नागपूर, रामटेक व सेलू येथे हलकासा पाऊस झाला.