लोणावळ्यात जोरदार पाऊस
By admin | Published: June 13, 2016 02:03 AM2016-06-13T02:03:07+5:302016-06-13T02:03:07+5:30
येणार येणार म्हणून आठवडाभरापासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने अखेर रविवारी शहरात तासभर जोरदार हजेरी लावली.
लोणावळा : येणार येणार म्हणून आठवडाभरापासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने अखेर रविवारी शहरात तासभर जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून लोणावळ्यात असलेल्या ढगाळ वातावरणाला अखेर पाझर फुटला.
सकाळपासूनच लोणावळा परिसरात पावसाचे काळे ढग दाटून येत होते. मात्र, पावसाचा थेंबही गळत नव्हता. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक पावसाने तासभर जोरदार हजेरी लावत सर्वांना सुखद धक्का दिला. रविवारच्या सुटीमुळे लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आहेत. या पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. पहिलाच पाऊस असल्याने स्थानिकांनीदेखील भिजण्याला प्राधान्य दिले. ग्रामीण भागात मात्र पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे भातरोपांची पेरणी करून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसाच्या आगमनाची चाहूल लागल्याने विंचवाचे बिऱ्हाड असणाऱ्या मेंढपाळांनी घराकडची वाट धरली. त्यामुळे महामार्गावर त्यांच्या बकऱ्या व घोडे परतीच्या मार्गावर दिसत होते. लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढणार ही शक्यता गृहीत धरून व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे. तसेच पर्यटकांच्या स्वागतासाठी लोणावळा परिसरातल हॉटेल सज्ज झाले आहेत. लोणावळ्यातील पर्यटकांनी हुल्लडबाजी करून नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाल्ीा आहे. भुशी धरण भरण्याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे. गेले अनेक दिवस पाऊस नसल्याने लोणावळ्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. परंतु पर्यटकांच्या गर्दीमुळे अर्थव्यवस्थाही सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(वार्ताहर)