नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह कोकणात अतिवृष्टीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 09:31 PM2019-08-05T21:31:08+5:302019-08-06T09:00:01+5:30
कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण,गोव्यात तुरळक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण,गोव्यात तुरळक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ७ व ८ ऑगस्टला कोल्हापूर, सातारा, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असून मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे़. विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला आहे़. दक्षिण गुजरात किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने हा पाऊस होत आहे़. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे़. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला़. मराठवाड्यात उमरगा ६०, निलंगा ३०, फुलंब्री, वैजापूर २०, औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, लोहारा, तुळजापूर, उदगीर १० मिमी पाऊस झाला़. विदर्भात अकोट, चिखलदरा, वर्धा २० मिमी पाऊस झाला असून काही ठिकाणी किरकोळ पाऊस झाला़.
इशारा : ६ ऑगस्ट रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़. ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, गोव्या तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़.
- सातारा, कोल्हापूर, नाशिक येथे ६ ऑगस्टला काही ठिकाणी जोरदार तर ७ व ८ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़.
- रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात पुढील चार दिवस अनेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता.
- रायगड व ठाणे जिल्ह्यात ६ व ७ ऑगस्टला तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता.
- पालघर जिल्ह्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस.
- पुणे जिल्ह्यात घाट परिसरात पुढील चार दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता.
- अन्य जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता़ .