सिंधुदुर्गात दमदार पाऊस
By Admin | Published: June 8, 2016 03:24 AM2016-06-08T03:24:35+5:302016-06-08T03:24:35+5:30
विजांच्या लखलखाटासह मुसळधार पावसाने कुडाळ तालुक्याला मंगळवारी झोडपले.
कुडाळ/वेंगुर्ले : विजांच्या लखलखाटासह मुसळधार पावसाने कुडाळ तालुक्याला मंगळवारी झोडपले. पिंगुळी शेटकरवाडी येथे माडावर वीज पडून अजय सावंत यांच्या घरात विजेचा लोळ घुसला. सुदैवाने सावंत कुटुंबीय बचावले. वीज पडल्याने आसपासच्या पाच ते सहा घरांनाही तडा गेला.
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस पंचक्रोशीत झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सावंतवाडी, कणकवलीसह जिल्ह्याच्या विविध भागांत मृग नक्षत्राला पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कुडाळ तालुक्यात पिंगुळी शेटकरवाडीत अजय सावंत यांच्या घराशेजारच्या माडावर दुपारी वीज पडली. विजेचा लोळ सावंत यांच्या घरात घुसला. घरावरून जाणाऱ्या केबल जळाल्या.
सोमवारी रात्री तुळस गावात वादळी पावसामुळे घरांचे नुकसान झाले. वीज पडली, त्या वेळी अजय सावंत, त्यांची पत्नी, दोन लहान मुली व वडील जेवत होते. सावंत कुटुंबीय त्यात बालबाल बचावले. मात्र, विजेचा थरार अजूनही डोळ्यासमोरून जात नाही, असे अजय सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)