दक्षिण महाराष्ट्रात पाऊस; सोलापूर बाजारपेठेत पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:26 AM2020-06-17T04:26:11+5:302020-06-17T04:26:26+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातही धुव्वाधार; सांगलीतही हजेरी
सोलापूर/कोल्हापूर/सांगली/सातारा : राज्यात सर्वदूर मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मंगळवारी दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. सोलापुरला पावसाने शहरातील बाजारपेठा आणि भाजीमंडईत पाणी साचले होते. कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता. सातारा जिल्ह्यात रिमझिम सुरू होती.
सोलापूर शहर व जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपासून पाऊस सुरू झाला. त्यामुळे बाजारपेठा, भाजीमंडई, रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे चित्र होते.
कोल्हापूरला धरणक्षेत्रासह गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात तीन फुटांनी वाढ झाली. सांगली जिल्ह्यात शिराळ्यापासून जतपर्यंत सर्वच तालुक्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात रिमझिम सुरू होती.
कोकणात संततधार
रत्नागिरी/सिंधुदुर्ग : कोकणात संततधार सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी कुडाळ तालुक्यातील ब्रिटीशकालीन माणगाव-आंबेरी पूल पाण्याखाली गेला होता. निर्मला नदीला आलेल्या पुरामुळे माणगाव परिसरातील तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला आहे.
नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. २४ तासांत सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक १२५ मि.मी. पाऊस झाला.
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
बुधवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. १८ जून रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाड्यात मंगळवार कोरडा
हिंगोली/बीड/परभणी/नांदेड/ उस्मानाबाद : मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत मंगळवार तसा कोरडा गेला. सोमवारी रात्री हिंगोली, बीड, परभणी, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे़