राज्यात मतदानाच्या दिवशीही कोसळणार धो धो पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 09:10 PM2019-10-19T21:10:19+5:302019-10-19T21:18:57+5:30
सर्वच प्रमुख पक्षांची घेतला धसका..
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे़. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडला असून पुढील दोन दिवसात कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. त्यामुळे राज्यात २१ आक्टोबरला मतदान होत असून त्यादिवशीही पाऊस होणार आहे़.
हवामान विभागाने नैऋत्य मोसमी राज्यातून माघारी गेल्याचे जाहीर केले होते़. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यात पाऊस सुरु झाला आहे़. गेल्या २४ तासात सावंतवाडी १००, देगलूर ९६, देवगड ९४, कोल्हापूर १७़८, सोलापूर ३१, रत्नागिरी ११, पणजी ५३ सांगली ७, अहमदनगर ८ मिमी पावसाची नोंद झाली होती़.
शनिवारी दिवसभरात राज्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ११, कोल्हापूर ११, महाबळेश्वर १३, नाशिक ७, मुंबई, सांताक्रुझ ७, अलिबाग ६, औरंगाबाद २, अकोला ५, ब्रम्हपुरी २ मिमी पावसाची नोंद झाली होती़.
* इशारा : २० ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, तर गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़ २१ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता २२ व २३ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़.
़़़़़़़़
२० व २१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात गडगडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे़. पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, चार जिल्ह्यात २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. तसेच बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात २० व २१ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे़.. अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़.