विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस
By admin | Published: June 24, 2016 05:05 AM2016-06-24T05:05:45+5:302016-06-24T05:05:45+5:30
दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाडा, तसेच विदर्भात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
पुणे/औरंगाबाद/पणजी : दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाडा, तसेच विदर्भात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. बुधवारी औरादवर मनसोक्त बरसलेला मान्सून गुरुवारी दुपारी चाकूर (जि. लातूर) तालुक्यातील हटकरवाडी परिसरावर तब्बल सव्वा तास धो-धो कोसळला. त्यामुळे शिवारातील बांध व पेरा वाहून गेला असून गावालगतची घरणी नदी दुथडी वाहू लागली आहे. हटकरवाडी हे गाव नळेगाव व घरणी गावाच्या मधोमध आहे. दुपारी या गावाच्या तीन ते चार किलोमीटर अंतरातच हा मुसळधार पाऊस झाला. असा मोठा पाऊस या परिसरात बऱ्याच वर्षांनंतर झाल्याचे उपसरपंच जी. टी. मलशेट्टी यांनी सांगितले. जन्मापासून असा मोठा पाऊस आम्ही पाहिला नसल्याची प्रतिक्रिया हटकरवाडी येथील प्रभाकर हुडगे यांनी दिली. अजनसोंडा (खु.), बोळेगाव या ठिकाणीही पाऊस झाला. याशिवाय मराठवाड्यामध्ये सिल्लोड, अहमदपूर, औरंगाबाद, हिंगोली आदी ठिकाणी पाऊस झाला. जालना जिल्ह्यात ७७.७७ मिली मीटर पावसाची नोंद झाली.
विदर्भात अकोला, नागपूर, बार्शी टाकळी, बुलडाणा, अंजनगाव आदी भागांमध्ये, तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, शेवगाव,चाळीसगाव, दौंड, महाबळेश्वर येथे पाऊस पडला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नंदुरबार जिल्ह्यात वीज पडून दोन ठार
नंदुरबार : राणीपूर (ता.शहादा) येथे वीज पडून शेतात काम करीत असलेल्या दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. गौरव हिंमत पावरा (सात वर्ष) व नर्मदाबाई शांतीलाल पावरा ( वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मान्सूनसाठी स्थिती अनुकूल झाली आहे. येत्या तीन ते चार दिवसात पश्चिम उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशाचा उर्वरित भाग, हरियाणा, चंडीगड-दिल्ली व पंजाबच्या बहुतांश भागात तो सक्रीय होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.