पावसाचे पुन:श्च हरिओम, विदर्भात मुसळधार; कोकण, मराठवाड्यातही बरसल्या सरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 06:20 AM2021-07-09T06:20:57+5:302021-07-09T06:22:10+5:30
मुंबई, कोकणासह विदर्भात सर्वदूर पाऊस पडला, तर मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
मुंबई/नागपूर : पंधरा दिवसांपेक्षाही जास्त दिवस ओढ दिलेल्या पावसाने अखेर राज्यात दमदार ‘पुन:श्च हरिओम’ केले आहे. मुंबई, कोकणासहविदर्भात सर्वदूर पाऊस पडला, तर मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली. आणखी पाऊस आला, तर दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. दिवसभरात तब्बल ९९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पेंच नवेगाव खैरी धरण पूर्णपणे भरले. त्यामुळे या धरणाचे गेट उघडावे लागले. गडचिरोली, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. अमरावतीतही दमदार पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यातही पावसाने कमबॅक केले. या पावसामुळे भातासह इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात नदीवरील पूल ओलांडून जाण्याचा प्रयत्न करणारे दोन जण वाहून गेले.
कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणक्षेत्रातही पावसाचा जोर होता.
मराठवाडा : परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. अहमदनगर शहरासह श्रीगोंदा, जामखेड, अकोले तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
येत्या २४ तासात मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार तर, काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १० जुलैपासून राज्यातील पाऊसमान वाढण्याची चिन्हे आहेत. येत्या १० ते १२ जुलैदरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला.
१२ जुलैला कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्यात ‘ऑरेंट अलर्ट’ दिला असून घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनसाठीचे हवामान अनुकूल झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि हवेच्या वरील स्तरात अनुकूल असलेले हवामान यामुळे महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसांत चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ,
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग