काेकणाला अतिवृष्टीचा इशारा; पुढील पाच दिवस राज्याला झोडपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 07:13 AM2022-08-06T07:13:42+5:302022-08-06T07:13:56+5:30
राज्यात जुलैमध्ये आधीच जास्त पाऊस झाला आहे. आता पाच दिवस मान्सून सक्रिय राहील.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून, हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलांमुळे पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि लगतच्या जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टी शक्यताही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.
दुसरीकडे राज्यात जुलैमध्ये आधीच जास्त पाऊस झाला आहे. आता पाच दिवस मान्सून सक्रिय राहील. राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचू शकतात. त्यामुळे नद्यांकाठी राहणाऱ्या लोकांनी या कालावधीत पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे.
मान्सून सक्रिय असल्याने राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता आहे. २४ तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान खाते
ऑरेंज अलर्ट
६ ऑगस्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.
७ ऑगस्ट : रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली.
८ ऑगस्ट : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, गडचिरोली.
९ ऑगस्ट : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा