शहर, उपनगरात पावसाची जोरदार हजेरी

By Admin | Published: August 27, 2016 01:42 AM2016-08-27T01:42:40+5:302016-08-27T01:42:40+5:30

श्रावण महिना सुरू झाल्यापासून अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली.

Heavy rains in the city, suburbs | शहर, उपनगरात पावसाची जोरदार हजेरी

शहर, उपनगरात पावसाची जोरदार हजेरी

googlenewsNext


मुंबई : श्रावण महिना सुरू झाल्यापासून अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात कोसळलेल्या पावसाचे प्रमाण कमी असले तरीदेखील दक्षिण आणि मध्य मुंबईत दुपारी तब्बल तीन तास कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली. तीन तासांत शहरात १६.९४ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ४.१५ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात २.६८
मिलीमीटर पाऊस पडला. दरम्यान, ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असल्या तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
जून आणि जुलै महिन्यात तुफान बरसलेल्या पावसाचा आॅगस्ट महिन्यात जोर ओसरला. श्रावण सुरू झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा वगळता शहर आणि उपनगरात पाऊस सलग पडला नाही. विशेष म्हणजे दहीहंडीदिवशी तर शहर आणि उपनगरात दिवसभर कडाक्याचे ऊन होते.
शुक्रवारी मात्र पावसाने भल्या पहाटेच मुंबईकरांनी वर्दी दिली. शहरात सकाळपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम सायंकाळपर्यंत कायम होती. महत्त्वाचे म्हणजे दुपारी २ वाजता दक्षिण आणि मध्य मुंबईवर दाटून आलेल्या ढगांमुळे पावसाने पुढचे तब्बल तीन तास आपला मारा सुरू ठेवला. कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, महालक्ष्मी, वरळी आणि दादरसह लगतच्या परिसरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोसळलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. पूर्व उपनगरात सकाळी ११ वाजता दाटून आलेल्या ढगांमुळे सायन, कुर्ला, विद्याविहार आणि घाटकोपर येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. याचवेळी पश्चिम उपनगरात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. (प्रतिनिधी)
>वाहतुकीवर परिणाम
पावसाचा वेग कायम राहिल्याने मशीद बंदर, भायखळा, दादर येथील टिळक ब्रिज, दादर आणि माटुंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन सर्कल, लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो, कमानी जंक्शन आणि घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा, अंधेरी ते साकीनाका मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.
पावसातील पडझडीच्या घटना सुरूच असून, पूर्व उपनगरात भिंत पडल्याची घटना घडली. शहरात दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा दोन ठिकाणी झाडे पडली.

Web Title: Heavy rains in the city, suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.