रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 05:44 AM2021-07-14T05:44:25+5:302021-07-14T05:45:04+5:30
दरड कोसळली, पूल वाहून गेला, दोघेजण बुडाले.
रायगड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा सुरूच आहे. मुंबई-पुणे महामार्गावर काजूवाडीजवळ, श्रीवर्धन-नानवली आणि मुरुड-सावली या ठिकाणी दरडी काेसळल्याने वाहतूक ठप्प हाेती, तसेच मुरुड-विहूर परिसरातील पुलाची एक बाजू वाहून गेली आहे. माेहपाडा येथे दाेघांचा बुडून मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर अतिवृष्टीने पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे, तर १४ जुलैपर्यंत पावसाचा तडाखा कायम राहणार असल्याने, प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन-नानवली रस्त्यावर आज दरड कोसळली. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरड हटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
१२ जुलैच्या रात्री मुंबई-पुणे महामार्गावरील काजूवाडी परिसरात दरड कोसळली होती. युद्धपातळीवर काम करून रात्रीच दरड हटविण्यात आली आहे. मुरुड तालुक्यातील सावली टोकेखार या ठिकाणी दरड काेसळल्याने वाहतूक बंद होती. दरड हटविण्याचे काम सुरू आहे. मुरुड तालुक्यातील विहूर येथील पुलाची एक बाजू अतिवृष्टीने वाहून गेली आहे. त्यामुळे दोन्हीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. १२ जुलै रोजी मोहपाडा येथील पलस धरणात बुडून सागर अंबरे (२२) याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दोन तासांनी मिळाला, तसेच मोहपाडा तलावातही राकेशकुमार (१९) हा युवकही १२ जुलै रोजी बुडाला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी तब्बल २४ तासांनी मिळाला. महाड तालुक्यातील म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर रावढळ-तुडील पुलावरून अतिवृष्टीने पाणी जात असल्याने तो वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे, तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
मुंबईत पावसाची जोर‘धार’; ऑरेंज अलर्ट कायम
मुंबई : मुंबईसह कोकणाला हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट कायम असून, १४ जुलै रोजी कोकणात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. शिवाय किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. सोमवारी कोसळलेल्या पावसानंतर मंगळवारी सकाळीदेखील मुंबईत पावसाचा मारा कायम होता.
सौराष्ट्र किनारीपट्टी ते पश्चिम - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत (दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओरिसा) कमी दाबाचा पट्टा असून, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत तीन ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. ११ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. २२ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. सकाळी कोसळलेल्या पावसाने दुपारी मात्र विश्रांती घेतली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली होती.
१४ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातदेखील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १५ जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
११ कामगार किरकोळ जखमी
सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मार्वे मालाड येथील आयएनएस हमला, नेव्ही मेन गेट येथे तात्पुरत्या सेटचा भाग कोसळला. या दुर्घटनेत ११ कामगार किरकोळ जखमी झाले. त्यापैकी दहा जणांना आयएनएस हमला येथे उपचार करून सोडण्यात आले. एका जखमी कामगाराची प्रकृती स्थिर आहे.