कोकणात मुसळधार, रेल्वेसेवा ठप्प, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन सतर्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 07:37 PM2024-07-14T19:37:04+5:302024-07-14T23:27:34+5:30

रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

heavy rains in Konkan, railway services stopped, rise in water level of rivers, administration alert! | कोकणात मुसळधार, रेल्वेसेवा ठप्प, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन सतर्क!

कोकणात मुसळधार, रेल्वेसेवा ठप्प, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन सतर्क!

मुंबई : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई परिसर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यामुळे रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात कोंड, आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात रस्त्यावर पाणी भरले आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर, रत्नागिरीतील खेड-दिवाणखवटी येथे नदीला पूर आला असून सात गावांचा संपर्क तुटला आहे. गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला आहे. या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 

कोकण रेल्वेसेवा विस्कळीत
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. चिपळूण, खेड येथे पाणी भरल्याने रेल्वेच्या गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. दिवाणखवटी स्थानकाजवळ रूळावर दरड कोळल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.
रविवारी (दि.१४) रोजी सकाळपासूनच पावसाने जोर धरला असल्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले होते. तुतारी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस दोन तास ऊशीराने धावत होत्या तर एर्नाकूलम- हजरत निजामुद्दीन नेत्रावती एक्स्प्रेस तर सात तास ऊशिराने धावत होती. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

रायगडमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील दरडप्रवण अन पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच, कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. या नद्यांजवळच्या गावातील प्रशासनाने घेतलेली खबरदारी, पर्यायी व्यवस्था, यंत्रणेची सुसज्जता याची माहिती जिल्हा प्रशासनाकडू घेण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. 

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
रविवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुंबई गोवा महामार्ग देखील बंद झाला आहे. महामार्गावरील बोरघर बस स्टॉप येथे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरीही काही वाहन चालक धाडस करून स्वतःचा इतरांचा जीव धोक्यात घालून या पाण्यातून वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

अमरावतीमधील अंबा नाल्याला पूर 
मुसळधार पावसामुळे अमरावतीमधील अंबा नाल्याला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात एक १४ वर्षीय मुलगा वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. परवेज खान अफरोज खान असे या मुलाचे नाव आहे. घटनास्थळी रेस्क्यू पथक दाखल झाले आहे.

भिवंडी शहरात पावसाचा धुमाकूळ
भिवंडी शहरात रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरात हाहाकार उडवलेला आहे. शहरातील मुख्य भाजी मार्केट,बाजारपेठ, तीनबत्ती, नजराणा सर्कल,छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह ईदगाह झोपडपट्टी, कामवारी नदीकिनारी म्हाडा कॉलनी चाविंद्रा रस्ता, काकू बाई चाळ,देवजी नगर या संपूर्ण परिसरात पाणी साचले. भाजी मार्केट,छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटा पर्यंत पाणी शिरल्याने शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद पडला होता. नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत होती.

Web Title: heavy rains in Konkan, railway services stopped, rise in water level of rivers, administration alert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.