मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, लोकल सेवा विस्कळित
By admin | Published: June 21, 2016 07:10 AM2016-06-21T07:10:42+5:302016-06-21T10:38:00+5:30
मुंबईसह उपनगरात पडलेल्या पावसामुळे मध्ये रल्वेच्या गाड्या अप आणि डाऊन मार्गावर १५ - १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेवरही १० मिनिट उशिराने गाड्या धावत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ : चातकाप्रमाणे मान्सून पावसाची वाट पाहिलेल्या मुंबईकरांना पावसाने चांगलेच झोडपले. रात्रभर सुरु असलेला पाऊस मंगळवारी सकाळपर्यंत सुरु होता. पावसामुळे मुंबईची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईसह उपनगरात पडलेल्या पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम तिन्ही लाईनवरील सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रल्वेच्या गाड्या अप आणि डाऊन मार्गावर १५ - १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरही लोकल १० मिनिटं उशिराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वे लाईनवरील लोकलही अर्धा तास उशिराने धावत आहेत.
मुंबईत काल पहिल्याच तडाख्यात सखल बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने मुंबई महानगरपालिकेची नाले सफाई मोहिम तोंडावर आपटली. मंगळवारी पहाटे दक्षिण मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर अवघ्या दोन तासात मुंबई सेंट्रल नायर रूग्णालय परिसरात रस्ते पाण्याखाली गेले. आज मुंबईमध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कुलाबा, भायखळा, महालक्ष्मी, वरळी, दादर, सायन आणि कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड व वांद्रे, अंधेरी, बोरीवली आणि जोगेश्वरीत जोरदार हजेरी लावली.
मुंबईत गेल्या 24 तासात चांगला पाऊस झाला आहे. सोमवारपासून आज सकाळी 4 वाजेपर्यंत मुंबई शहरात 24.88 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरांमध्ये 10.93 आणि पूर्व उपनगरात 27.37 मिलीमिटर पाऊस पडला आहे.
अंदाजापेक्षा जवळपास १० दिवस उशिरा मान्सून राज्यात दाखल झाला. नेहमी कोकणमार्गे येणारा मान्सून यंदा विदर्भमार्गे दाखल झाला आहे.
सोमवारी दिवसभरात मुंबईत २४ मिमी, पुणे ०९, जळगाव ३, महाबळेश्वर १, नाशिक ७, अलिबाग १३, पणजी ६, औरंगाबाद १, अकोला ४ मिमी पाऊस झाला आहे़ कोकणातील रोहा येथे १७७ मिमी पावसाची नोंद झाली़ तसेच मुरुड, तळा ११०, माणगाव येथे प्रत्येकी ८०, मराठवाड्यात माजलगाव, उस्मानाबाद, पाटोदा प्रत्येकी ७०, सुधागड, पाली, जामखेड, परतूर येथे ६० मिमी पावसाची नोंद झाली़ आहे.