तिस-या दिवशीही पावसाचा जोर कायम, येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 08:16 AM2017-08-21T08:16:11+5:302017-08-21T08:35:42+5:30

शनिवार, रविवारनंतर तिस-या दिवशी म्हणजे सोमवारीदेखील (21 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Heavy rains in Mumbai in the next 24 hours | तिस-या दिवशीही पावसाचा जोर कायम, येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

तिस-या दिवशीही पावसाचा जोर कायम, येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

Next

मुंबई, दि. 21 - शनिवार, रविवारनंतर तिस-या दिवशी म्हणजे सोमवारीदेखील (21 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार परिसरातही पावसाचा जोर कायम आहे.

पावसाचा जोर कायम राहणार 
पुढील तीन-चार दिवस राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. सोमवारी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला.

दरम्यान, रविवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याला झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत जलधारांचा मारा कायम होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी पडलेल्या या पावसाने मुंबईकरांना सुखद गारवा दिला. दुपारचा काही वेळ वगळता, सकाळसह सायंकाळी सर्वत्रच कोसळलेल्या जलधारांनी मुंबई न्हाऊन निघाली. येत्या 48 तासांत मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

किना-यावरील गावांना सतर्कतेचा इशारा
सुट्टी, त्यात मेगाब्लॉक व पावसाच्या संततधारेने रविवारी ठाणे जिल्हा थंडावल्याचे चित्र होते. दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे भातसा धरणाच्या पातळीत वाढ झाली असून, रविवारी या धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे भातसा नदी किना-यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. माळशेज घाटातही संततधार पाऊस आणि दाट धुके असल्यामुळे वाहतूक मंदावली होती. भातसा नदीच्या पुरामुळे सापगावकडे जाणाऱ्या  पुलावरील वाहतूक बंद करावी लागली. कल्याणजवळील वाळकस पुलावर तीन फुटांवरून पाणी वाहत होते.

रायगडमध्ये जोर कायम

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद पेण येथे १२० मि.मी. झाली आहे. पेण तालुक्यातून गणेशमूर्ती परगावी रवाना होण्याच्या काळातच पावसाने जोर धरल्याने गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्यांची तारांबळ उडाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कामातही या पावसामुळे समस्या निर्माण होत आहेत.

पालघरला झोडपले
पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. जव्हार, विक्रमगड, मोखाडा, पालघर, डहाणू, वाडा येथे पावसाचा जोर जास्त होता. यामुळे गणेशोत्सवापूर्वी आलेल्या शेवटच्या रविवारच्या खरेदीच्या उत्साहावर विरजण पडले.

गोदावरीला पूर
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संध्याकाळी सहा हजार ४०० क्यूसेक इतके पाणी नदीपात्रात सोडले जात होते. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला.
पावसाचे ९ बळी
पावसाचे मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत वेगवेगळ््या दुर्घटनांत आठ बळी गेले. नगरला भिंत पडून एकाचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशसह मध्य भारतात येत्या दोन आठवड्यांत चांगला पाऊस अपेक्षित आहे. पावसाचा तुटवटा भरून निघेल, अशी आशा असली, तरी काही ठिकाणी पुराचाही धोका आहे. -माधवन राजीवन, सचिव, केंद्रीय भूविज्ञान खाते


 

Web Title: Heavy rains in Mumbai in the next 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.