पावसाची जोरदार हजेरी
By admin | Published: September 19, 2016 01:31 AM2016-09-19T01:31:52+5:302016-09-19T01:31:52+5:30
मावळासह कामशेत शहरात पावसाची संततधार सुरूअसून, शुक्रवारी व शनिवारी पावसाचा जोर वाढला होता.
कामशेत : मावळासह कामशेत शहरात पावसाची संततधार सुरूअसून, शुक्रवारी व शनिवारी पावसाचा जोर वाढला होता. जोरदार पडणाऱ्या या पावसामुळे मावळ परिसरातील शेतकरी सुखावला आहे. तसेच, या वेळी नाणे मावळातील वडिवळे धरणातून सात तास पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे कुंडलिका व इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे.
मागील अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मावळातील भातपीक संकटात आले होते. पावसाअभावी भातपीक सुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे भातपिकाला पाण्याची आवश्यकता होती. शुक्रवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने मावळातील भात पिकावरील संकट टळले. भातपीक अनेक रोगांपासून वाचण्यासाठी या पावसाचा फायदाच झाला आहे. तसेच डोंगरावरील चाराही सुकत चालला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. या पावसाने चाऱ्याला फुटवे येऊन जनावरांसाठी चांगला चारा तयार होईल.
नाणे मावळातील वडिवळे धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. गुरुवार पासून पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे धरण प्रशासनाने भोंगा वाजवून नदीकिनारी असणाऱ्या भाजगाव, उकसान, सोमवडी, कोळवाडी, उंबरवाडी, वळवंती, गोवित्री, करंजगाव आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शनिवारी (दि. १७) सातपासून ते रविवारी रात्री उशिरा २ वाजेपर्यंत २७२९ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली. धरणातून पाणी सोडल्यामुळे कुंडलिका व इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली होती. सांगिसे पुलाला नदीचे पाणी लागले होते.
मागील १५ दिवसांपासून पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे अनेक भागातील भातपिके धोक्यात आली होती. पण शुक्रवारपासून पडत असलेला पाऊस लाभदायक ठरणार आहे. हा पाऊस आठ दिवस उशिरा झाल्याने उत्पादनात ५ ते १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे कृषी अधिकारी विनायक कोथिंबिरे यांनी सांगितले.(वार्ताहर)
तळेगाव : आठवडा बाजारात धांदल
तळेगाव दाभाडे : तळेगावममध्ये रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. तसेच पावसामुळे थंडी तापाच्या रुग्णामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यामध्ये रुग्णाची गर्दी दिसत आहे. आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. तसेच दिवसभर कोणीही फिरकले नसल्याने शेतकऱ्यांना माल पर न्यावा लागला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.