राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
By admin | Published: July 30, 2015 02:09 AM2015-07-30T02:09:33+5:302015-07-30T02:09:33+5:30
पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकसह केरळवर पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात ठिकाठिकाणी पावसाच्या धारा कोसळतच असून, या कमी
मुंबई : पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकसह केरळवर पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात ठिकाठिकाणी पावसाच्या धारा कोसळतच असून, या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढत असल्याने पुढील ७२ तासांसाठी राज्यासह मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्य राजस्थान आणि गुजरात लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची कायम आहे. ईशान्य बंगालचा उपसागर, बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र स्थिर असून, त्याची तीव्रता कायम आहे. समुद्र सपाटीवर कर्नाटक किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी झाला आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.
३० जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. ३१ जुलै आणि १ आॅगस्ट रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. २ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पडेल. पुढील ४८ तासांत मुंबईत पावसाच्या मुसळधार सरी पडण्याची शक्यता असून, कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३०, २४ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
जलसंकट टळणार : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलाशय निम्मे भरले आहेत. परिणामी मुंबईत १ आॅगस्टपासून लागू होणारी १५ टक्के पाणीकपात टळण्याची चिन्हे आहेत. आता या जलाशयांमध्ये पुढील १८० दिवस पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे.