जोरदार पावसाचे राज्यात ५ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:56 AM2017-07-18T01:56:00+5:302017-07-18T01:56:00+5:30
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राज्यातही पुणे, कोल्हापूर, सातारा, गोंदियासह काही ठिकाणी पाऊस सुरू होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राज्यातही पुणे, कोल्हापूर, सातारा, गोंदियासह काही ठिकाणी पाऊस सुरू होता.
मंगळवारी कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच १९ व २० जुलैला संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली, पण त्यानंतर दमदार पाऊस सुरू
राहिला. सातारा जिल्ह्यात
पावसाचा जोर वाढला असून कोयना धरणातील पाणीसाठ्यात तीन टीएमसीने वाढ झाली. महाबळेश्वर, कोयना, पाटण तालुक्यात पाऊस कायम आहे.
रत्नागिरीत बावनदीत
बुडून एकाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बावनदीत बुडून रमेश लक्ष्मण गुरव (५०) यांचा मृत्यू झाला.
गोंदियात पुरात मायलेक वाहून गेले
गोंदिया जिल्ह्यातील वाघनदी काठावरील सावंगी (ढिवरटोला) येथे दुर्गा
खनोज भगत (३०) व जितू (६ महिने) या मायलेकांचा पुरात वाहून मृत्यू झाला. वाघनदी ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. दुसऱ्या घटनेत पदमपूर (पोवारीटोला) कालव्याजवळ गुरे चरण्यासाठी गेलेले रमेश धोंडू महारवाडे (३५) व मुन्ना सीताराम भांडारकर (२२) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.