यंदा भरपूर पाऊस: पिक परिस्थिती साधारण; भेंडवड घटमांडणीचे भाकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 10:38 AM2022-05-04T10:38:51+5:302022-05-04T10:38:57+5:30
Prediction of Bhendwad formation : घटमांडणी चे भाकितानुसार यावर्षी पर्जन्यमान चांगले सांगितले असून, जून महिन्यात साधारण पाऊस येईल.
- जयदेव वानखडे
जळगाव जामोद: तीनशे वर्षाची परंपरा लाभलेली सुप्रसिद्ध भेंडवड घटमांडणी ची भविष्यवाणी आज दिनांक 4 मे रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केली.
गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील पारावर केलेली घटमांडणी आणि अक्षय तृतीयेला झालेली घट मांडणी या दोन्ही मांडणीचे साधर्म्य तपासून आजच्या घटमांडणी चे भाकीत जाहीर करण्यात आले. भेंडवड घटमांडणी चे भाकितानुसार यावर्षी पर्जन्यमान चांगले सांगितले असून, जून महिन्यात साधारण पाऊस येईल. सार्वत्रिक पाऊस होणार नाही. जुलै महिन्यात कमी पाऊस पडेल. तर ऑगस्ट महिन्यामध्ये जून-जुलै पेक्षा जास्त पाऊस पडेल. आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त पाऊस सांगितला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली आहे.
आणि पीक परिस्थिती साधारण चांगली राहील. अवकाळी पाऊस सुद्धा पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
देशाचा राजा कायम असून,राज्याच्या अडचणीत वाढ होणार आहे आर्थिक परिस्थिती खालावलेली राहील, शत्रूपासून त्रास संभवतो परंतु भारताचे संरक्षण व्यवस्था त्याचा मजबुत सामना करेल. देशाच्या तिजोरीत आहे तर अनेक ठिकाणी चारा टंचाई सुद्धा असेल पावसाळा भरपूर असल्याने जलाशय भरलेली राहतील, टंचाई जाणवणार नाही. तसेच पृथ्वीवर अनेक नैसर्गिक संकटे येतील. त्यामुळे जनतेला सांभाळून रहावे लागणार आहे. यावर्षी रोगराई मात्र कमी असेल. धनधान्याच्या भावात चढ-उतार राहतील, असे भाकीत आज पार पडलेल्या भेंडवड घटमांडणीने वर्तविले आहे हे घटमांडणी ऐकण्यासाठी आज पंचक्रोशीतून हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. आजच्या गट भांडणामुळे शेतकर्यांमध्ये चांगल्या पिक पाण्याबाबत आनंदी वातावरण होते तर पृथ्वीवर येणाऱ्या नैसर्गिक संकटांना बाबत चिंतेचे वातावरण दिसून आले..