कॅश डिपॉझिट करण्यासाठी एटीएमच्या बाहेर प्रचंड गर्दी
By Admin | Published: November 8, 2016 10:39 PM2016-11-08T22:39:57+5:302016-11-08T22:45:36+5:30
आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनात वापरता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घेतला.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनात वापरता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घेतला. या निर्णयामुळे 500 आणि 1000 च्या नोटा डिपॉझिट करण्यासाठी एटीएमच्या बाहेर अनेकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता 500 आणि 1000 च्या नोटा दैनंदिन व्यवहारात वापरता येणार नाहीत. 30 डिसेंबर 2016पर्यंत 500 आणि 1000च्या नोटा पोस्टात किंवा बँकेत जमा करता येणार आहेत. तसेच ज्यांना 500 आणि 1000च्या नोटा 30 डिसेंबर 2016पर्यंत जमा करता येणार नाहीत त्यांना 31 मार्च 2017पर्यंत आयडी प्रूफसह नोटा जमा करण्याची मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रुग्णालयात 11 नोव्हेंबर 2016पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. रेल्वे, बस आणि विमानतळाच्या तिकीट काऊंटरवर या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.
मात्र मोदींच्या या निर्णयामुळे राज्यभरासह मुंबईकरांची अक्षरशः तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. एकंदरित या निर्णयामुळे राज्यासह देशभरातील एटीएमच्या बाहेर 500 आणि 1000 च्या नोटा डिपॉझिट करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. तसेच, 100 रुपयांच्या नोटा काढण्यासाठी अनेकांनी एटीएमबाहेर रांगा लावल्या आहेत.