राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 08:00 AM2019-05-21T08:00:00+5:302019-05-21T08:00:11+5:30
सध्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कर्नाटकाच्या अंतर्गत भागात उष्णतेची लाट आली आहे़.
पुणे : दक्षिण अंदमान समुद्रात आलेला मान्सून अद्याप तेथेच स्थिरावला असून त्याच्या पुढील वाटचालीस अनुकुल वातावरण असतानाच राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेचा कहर होऊ लागला आहे़. २४ मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४५. ९ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे २०. ८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़. महाबळेश्वर वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे कमाल तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे़. मराठवाड्यातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे़. विदर्भातील कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून किमान तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले आहे़.
सध्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कर्नाटकाच्या अंतर्गत भागात उष्णतेची लाट आली आहे़.
२१ ते २४ मे दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ .२१ ते २४ मे दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.