कुंभमेळ्यामुळे मुंबई-नाशिक मार्गावर जड वाहनांना बंदी
By admin | Published: August 24, 2015 01:18 AM2015-08-24T01:18:52+5:302015-08-24T01:18:52+5:30
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी जड व मालवाहू वाहनांच्या
भातसानगर : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी जड व मालवाहू वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन केले आहे. २८ आॅगस्ट, १३ सप्टेंबर, १८ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर हे शाही स्नानाचे दिवस धरून त्यांच्या आदल्या व नंतरच्या दिवशी असे तीन दिवस मुंबई-नाशिक महामार्गावरील जड व मालवाहू तसेच कंटेनर, ट्रेलर आणि मल्टी एक्सल वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, एनएच-०४ मार्गे वळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शाही स्नानासाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना आपल्या छोट्या कारमधून प्रवास करताना मोठ्या व जड वाहनांच्या वाहतुकीचा त्रास होऊ नये तसेच वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागू नये, म्हणून अशा जड वाहनांची रहदारी अन्य मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती शहापूरजवळील चेरपोली येथील वाहतूक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक एन. पी. कुळकर्णी यांनी दिली.