शिरोली परिसरात भीषण पाणीटंचाई
By admin | Published: May 18, 2016 01:21 AM2016-05-18T01:21:13+5:302016-05-18T01:21:13+5:30
अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली
ओझर : १९७२मध्ये पडलेल्या दुष्काळात जेवढी भयानक स्थिती नव्हती त्यापेक्षा अधिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ या वर्षीच्या दुष्काळात शिरोली बुद्रुक आणि परिसरातील शेतकरीवर्गावर आली आहे. पाण्यासाठी विहिरींची खोदकामे करून खडकाशी झुंज या परिसरातील शेतकरीवर्ग देत आहेत.
शिरोली बुद्रुक गावाचा पश्चिम भाग शिरोली खुर्द, कुमशेत, महाबरेवाडी, गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ ही कुकडी नदीच्या काठवरची गावे आहेत. या नदीवर असलेल्या माणिकडोह धरणात जेमतेम फक्त पिण्यासाठीचा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना रब्बी हंगामातच सर्व धरण मोकळे केले. वर्षानुवर्षे तालुक्यात बागायत गावे म्हणून ओळख असलेली ही गावे गेली तीन महिने पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या गावांसाठी कुकडी नदीवर असणारे तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तीन महिन्यांपूर्वी कोरडे पडले आहेत. ना मायबाप सरकार काही करत, ना निसर्गाची साथ अशा कात्रीत या गावांतील शेतकरीवर्ग सापडला आहे. कर्ज काढून विहिरींची खोदकामे शेतकरी करीत आहे. परंतु भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली असल्यामुळे खडकाशी झुंज देऊनही पाणी मिळत नाही. शेतमाल पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र जागोजागी पाहावयास मिळत आहे.
न्याय कोणाकडे मागावा..?
या वर्षी शेतकऱ्यांना कांद्याने रडवले. या पिकाचा उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही. नीचांकी दराची पातळी कांद्याने गाठली आहे. उन्हाळी हंगामातील पिकांवर सर्व अर्थकारण सावरले असते. परंतु पाण्याने धोका दिल्यामुळे या गावांतील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला असल्याचे चित्र आहे. पूर्वीचा बागायत गावाचा शिक्का असल्यामुळे महसूल विभागाच्या पैसेवारींच्या गणितामुळे ही गावे दुष्काळग्रस्त गावांमध्ये मोडत नाहीत. परंतु सध्या दुष्काळाचा सामना करीत असलेल्या या गावांतील शेतकऱ्यांना न्याय कोणाकडे मागावा अशी अडचण निर्माण झाली आहे.
पाण्याअभावी काही शेतकऱ्यांनी जमिनी पडीक ठेवल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धडपड करून उन्हाळी टोमॅटो घेतले. परंतु त्यांना सिजेंटा कंपनीच्या सदोष बियाणांनी धोका दिला. या गावांतील शेतकऱ्यांनी विघ्नहरने अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना दुष्काळी परिस्थितीतून सावरण्यासाठी साकडे घातले आहे. शिरोली बुद्रुक कृषक सेवा या दहा गावांच्या सोसायटीच्या माध्यमातून विघ्नहरने अध्यक्ष तथा या सोसायटीचे अध्यक्ष सत्यशील शेरकर या गावांतील शेतकऱ्यांसाठी दुष्काळात देवदूताची भूमिका बजावत आहेत.