बेगला आर्थर रोड कारागृहात हलवा - हायकोर्ट
By admin | Published: October 10, 2015 02:16 AM2015-10-10T02:16:53+5:302015-10-10T02:16:53+5:30
पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या हिमायत बेगला नागपूर कारागृहातून आर्थर रोड कारागृहात हलवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
मुंबई : पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या हिमायत बेगला नागपूर कारागृहातून आर्थर रोड कारागृहात हलवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
हिमायत बेगच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. दुसरीकडे, पुण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बेगने उच्च न्यायालयात अपील केले आहे. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे सुरु आहे.
वकिलांना योग्य त्या सूचना द्यायच्या असल्याने, बेगने नागपूर कारागृहातून हलवण्यासाठी खंडपीठापुढे अर्ज केला होता.
या अर्जावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. फाशीची शिक्षा झालेल्यांना नागपूर किंवा पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात येते. आर्थर रोडमध्ये केवळ अंडरट्रायल्सना ठेवण्यात येते. त्यामुळे बेगला नागपूर कारागृहातून हलवू नये, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी केला.
खंडपीठाने या अपिलावरील सुनावणी होईपर्यंत बेगला नागपूर कारागृहाऐवजी आर्थर रोड कारागृहात ठेवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी)
सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहायचे आहे
बेग नागपूरच्या कारागृहात असल्याने त्याला सुनावणीसाठी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे उच्च न्यायालयात हजर करण्यात येत आहे. बेगला स्वत:ला प्रत्यक्षात या सुनावणीस हजर राहायचे आहे.