विमा कंपनीच्या कॉम्प्युटरवर टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 03:48 AM2016-11-17T03:48:17+5:302016-11-17T03:48:17+5:30
मुंबईतील एका रस्ते अपघातग्रस्तास मंजूर झालेली भरपाईची रक्कम देताना त्यावरील व्याजातून चुकीच्या पद्धतीने कापून घेतलेला ‘टीडीएस’
मुंबई : मुंबईतील एका रस्ते अपघातग्रस्तास मंजूर झालेली भरपाईची रक्कम देताना त्यावरील व्याजातून चुकीच्या पद्धतीने कापून घेतलेला ‘टीडीएस’ वसूल करण्यासाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या कार्यालयातील तीन संगणकांवर टाच आणण्याच्या कारवाईवर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे.
अशा प्रकारे टाच आणण्याचा आदेश मुंबईतील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने एका प्रकरणात दोन वर्षांपूर्वी दिला होता. त्याविरुद्ध विमा कंपनीने केलेली रिट याचिका न्या. गिरीश कुलकर्णी यांनी फेटाळून लावली. त्यामुळे ‘टीडीएस’ म्हणून कापलेली रक्कम कंपनीला अपघातग्रस्तास द्यावी लागणार आहे.
भरपाई रकमेवरील व्याजातून ‘टीडीएस’ कापून घेणे प्राप्तिकर कायद्यान्वये आमच्यावर बंधनकारक आहे. त्यानुसार आम्ही ‘टीडीएस’ कापून ती रक्कम प्राप्तिकर विभागाकडे जमाही केली आहे. आता ती रक्कम पुन्हा वसूल करणे म्हणजे तेवढी रक्कम दोनदा द्यायला लावणे होईल. हवी तर अपघातग्रस्ताने कापून घेतलेली रक्कम परत मिळण्यासाठी, शक्य असल्यास प्राप्तिकर विभागाकडे अर्ज करावा, असे विमा कंपनीचे म्हणणे होते. मात्र न्यायालयाने ते अमान्य केले. वरळी नाका, मुंबई येथील सिद्धार्थनगरमध्ये राहणारे हुसैन बाबुलाल शेख हे जो जोसेफ यांच्या मोटारीच्या अपघातात जखमी झाले होते. न्यायाधिकरणाने जुलै २०१२ मध्ये ३.४३ लाख रुपयांची भरपाई अर्ज केल्याचा दिवसापासून ७.५ टक्के व्याजासह मंजूर केली. विमा कंपनीने व्याजासह ४.६० लाख रुपये जमा केले. परंतु व्याजाचा हिशेब करताना त्यातून ४०,०३४ रुपये ‘टीडीएस’ कापून घेतला. शेख यांनी पुन्हा न्यायाधिकरणाकडे अर्ज केला व पूर्ण भरपाई देण्याची विनंती केली. न्यायाधिकरणाने ती मंजूर केली व विमा कंपनीने कापून
घेतलेली रक्कम स्वत:हून न दिल्यास त्यांच्या कार्यालयातील तीव संगणकांवर टाच आणण्याचा आदेश दिला. (विशेष प्रतिनिधी)