मेडीगट्टा धरणाची उंची १०० मीटर ठेवणार
By Admin | Published: May 14, 2016 03:03 AM2016-05-14T03:03:18+5:302016-05-14T03:03:18+5:30
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यालगत तेलंगणात होणाऱ्या मेडीगट्टा धरणाची उंची १०० मीटर ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत घेतला आहे
मुंबई : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यालगत तेलंगणात होणाऱ्या मेडीगट्टा (कल्लेश्वरम) धरणाची उंची १०० मीटर ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत घेतला आहे. त्यामुळे आता फक्त ५६ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून एकही गाव बाधित होणार नाही, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत होणाऱ्या या मेडीगट्टा धरणामुळे सुमारे २५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून, अनेक गावे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यपाल तेलंगणाचे असल्याने त्यांच्या दबावापोटी राज्य सरकार तेलंगणाचा प्रकल्प पुढे रेटत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या धरणाची उंची वाढविण्यास स्थानिकांनीही विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत धरणाची उंची १०० मीटर ठेवण्यावर एकमत झाले असून या धरणामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही की वन विभागाची जामीन बाधित होत नाही, असा दावा मंत्री महाजन यांनी केला आहे. (विशेष प्रतिनिधी)