17 ऑगस्टला ठरणार दहीहंडीची उंची
By admin | Published: August 10, 2016 11:32 AM2016-08-10T11:32:52+5:302016-08-10T11:34:32+5:30
दहीहंडीची उंची 20 फुटापेक्षा अधिक ठेवावी की नाही तसंच 18 वर्षाखालील मुल दहीहंडीत सहभागी होऊ शकतात नाही यासंबंधी सर्वोच्च न्यायालय 17 ऑगस्टला आपला निकाल देणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 10 - दहीहंडीबाबत सर्वोच्च न्यायालय 17 ऑगस्टला आपला निकाल देणार आहे. दहीहंडीची उंची 20 फुटापेक्षा अधिक ठेवावी की नाही तसंच 18 वर्षाखालील मुल दहीहंडीत सहभागी होऊ शकतात नाही यासंबंधी सर्वोच्च न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे. दहीहंडीच्या थरांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्टता नसल्याने उच्च न्यायालयाने याबाबत स्पष्टीकरण आणण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.
दहीहंडीसाठी २० फुटांपर्यंतच मानवी मनोरे रचण्याचा निर्बंध उच्च न्यायालयाने घालूनही २०१५मध्ये अनेक आयोजकांनी या आदेशाचे उल्लंघन केले. त्याविरुद्ध मूळ याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर याचिका निकाली काढली.
सर्वोच्च न्यायालयाने आदेशात उच्च न्यायालयाने मानवी मनोऱ्यांवर घातलेल्या निर्बंधासंबंधी काहीही उल्लेख न केल्याने उच्च न्यायालयाचा आदेश लागू होत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. तर न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने काहीही उल्लेख न केल्याने आधीचा आदेश लागू होतो, असे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत उच्च न्यायालय आणि राज्य सरकारचे वेगळे मत असल्याने खंडपीठाने सरकारला या आदेशाबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे.