हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री बचावले!
By Admin | Published: May 26, 2017 04:07 AM2017-05-26T04:07:56+5:302017-05-26T04:07:56+5:30
मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी जमलेल्या प्रचंड गर्दीवर धूळ उडवत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावले आणि काही क्षणात ते जवळच्याच झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले.
गोविंद इंगळे
लोकमत न्यूज नेटवर्क
निलंगा (जि. लातूर) : मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी जमलेल्या प्रचंड गर्दीवर धूळ उडवत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावले आणि काही क्षणात ते जवळच्याच झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले. धुळीचे लोट असल्याने नेमके काय घडले ते कोणालाच कळले नाही... पायलट संजय कर्वे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जण बालंबाल बचावले. या अपघातात पायलट कर्वे यांच्यासह इतर दोघे नागरिक किरकोळ जखमी झाले. निलंगा (जि. लातूर) येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानाजवळ सकाळी ११.४९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
मुख्यमंत्री बुधवारपासून लातूर जिल्हा दौऱ्यावर होते. बुधवारी निलंगा येथे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी मुक्काम केल्यानंतर गुरुवारी सकाळी ७ वाजता हलगरा येथे त्यांनी पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात श्रमदान केले. त्यानंतर औराद शहाजानी, हंगरगा, अनसरवाडा गावांना भेटी देऊन संवाद सभा घेऊन ते निलंग्याकडे रवाना झाले. निलंग्यातील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर (व्हीटी-सीएमएम) सज्ज ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री येणार असल्याने निलंगेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री हेलिपॅडवर पोहोचले. नागरिकांना अभिवादन केल्यानंतर ११.४८ वाजता ते हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसले. त्यांच्यासमवेत अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, जनसंपर्क अधिकारी केतन पाठक, खासगी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार होते. पायलट संजय कर्वे यांनी हेलिकॉप्टर सुरू केले. ११.४९ वाजता हेलिकॉप्टरने ‘टेक आॅफ’ घेताच धुळीचे प्रचंड लोट आकाशात उडाले. काहीच दिसेनासे झाले. हेलिकॉप्टर सुमारे शंभर मीटर उंचीवर असतानाच ते नजिकच्या झोपडपट्टीच्या दिशेने कोसळले. सगळीकडे धुरळा असल्याने नेमके काय झाले हे कोणालाच कळले नाही. सर्वजण सैरावैरा धावत सुटले. एकच हाहा:कार उडाला. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल या सर्वांनीच झोपडपट्टीत धाव घेतली. धुळीचे लोट कमी झाल्यानंतर नेमके काय झाले ते कळले. पोलीस आणि मैदानावरील कार्यकर्ते झोपडपट्टीत पोहोचण्यापूर्वीच तेथे उपस्थित असलेले नागरिक इरफान शेख यांनी हेलिकॉप्टरचे दार काढून मुख्यमंत्र्यांना बाहेर काढले. मुख्यमंत्र्यांसह सर्वजण सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.
गर्दीतून वाट काढत मुख्यमंत्र्यांना अॅम्ब्युलन्सद्वारे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी रवाना केले. येथे तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. दुपारी ३.२२ वाजता ते मुख्यमंत्री लातूरहून विमानाने मुंबईकडे रवाना झाले.
वीज प्रवाह बंद झाल्याने मोठा अनर्थ टळला
हेलिकॉप्टरचे पंखे वीज तारांना घासल्यामुळे स्पार्किंग होऊन तारा तुटल्या आणि वीज प्रवाह खंडित झाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
चौकशीचे आदेश
नागरी विमान वाहतूकच्या महासंचालकांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून राज्य सरकारदेखील स्वतंत्र चौकशी करणार आहे.
मोदी, शहांनी केली विचारपूस
या अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो
हेलिकॉप्टरने टेकअप घेतल्यानंतर काही क्षणामध्येच सिग्नलमध्ये प्रॉब्लेम असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु, विद्युत खांबाच्या तारांना पंखा लागल्याने हेलिकॉप्टर अस्थिर होऊन कोसळले. आम्ही चौघेही एकमेकांच्या अंगावर पडलो. जनसंपर्क अधिकारी केतन पाठक यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. नशीब बलवत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांसह आम्ही सगळेच सुखरुप बचावलो.
- अभिमन्यू पवार, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक
विद्युत खांबाला पंखा घासल्याने अपघात
हवेचा दाब कमी झाल्यामुळे हेलिकॉप्टर अस्थिर झाले. त्यामुळे लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विद्युत खांबावरील तारा पंख्याला लागल्यामुळे हेलिकॉप्टर अस्थिर होऊन कोसळले. ९० ते १०० फुटांवरील अंतर असावे. आमचे नशीब मोठे. त्यामुळे आम्ही वाचलो.
-संजय कर्वे, पायलट
हेलिकॉप्टरचा अपघात घडताच देवेंद्रजींनी आम्हाला फोन केला. माझ्याशी आणि आईशी ते बोलले आणि ते व सोबतचे सगळे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ते राज्यभर सतत फिरत असतात. शेतकरी, सर्वसामान्य माणसांशी थेट संवाद साधतात. या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि ईश्वरकृपेने ते सुखरुप राहिले, अशी माझी भावना आहे.
- अमृता फडणवीस, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी
घटनाक्रम...
शिवाजी विद्यालयाच्या हेलिपॅड मैदानावर ११.३० वाजता मुख्यमंत्री पोहोचले.
११.४८ वाजता ते हेलिकॉप्टरमध्ये बसले.
११.४९ वाजता हेलिकॉप्टरने टेकआॅफ घेतले
अन् काही क्षणात कोसळले.
११.५५ वाजता हेलिकॉप्टरमधून इरफान शेख या नागरिकाने मुख्यमंत्र्यांना बाहेर काढले
११.५८ वाजता अपघात स्थळापासून मुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना
१२ वाजता निलंगा येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य पाच जणांची वैद्यकीय तपासणी केली.
१२.१२ वाजता स्वत: मुख्यमंत्र्यांनी टष्ट्वीट करून महाराष्ट्रातील जनतेला मी सुखरुप असल्याचे सांगितले.
दुपारी २ वाजता निलंग्याहून लातूरकडे रवाना
३.२२ वाजता मुख्यमंत्र्यांचे विमान मुंबईकडे रवाना
................
गडचिरोलीमध्येही झाला होता तांत्रिक बिघाड...
गडचिरोली जिल्ह्यातील चामोशीॅ तालुक्यातील कोनसरी येथे १२ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांना कारने नागपुरला जावे लागले होते.
जनतेच्या आशीर्वादामुळे सुखरुप
हेलिकॉप्टरचा किरकोळ अपघात झाला. महाराष्ट्रातील ११ कोटी २० लाख नागरिकांच्या आशीर्वादामुळे आणि आई जगदंबेच्या कृपेमुळे मी व माझ्यासोबत असलेले सर्व सुखरुप आहोत. माझी प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही.
- देवेंद्र फडणवीस
आशीवार्दाच्या असंख्य अदृष्य ढाली माझ्या पाठीशी
निलंगा तालुक्यातील हलगरा येथे श्रमदान केल्यानंतर गावकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आंब्याच्या झाडाखाली उभे राहून संवाद साधत होते, त्यांच्या डोक्यावर एक तुटलेली फांदी कुठल्याही वेळी पडेल, अशा अवस्थेत होती. त्याकडे लक्ष गेलेल्या एक गावकरी मुख्यमंत्र्यांना म्हणाला, ‘आपण थोडे बाजूला उभे रहा, फांदी डोक्यावर पडेल’ मुख्यमंत्री जागेवरुन थोडेसे बाजूला होत म्हणाले, ‘घाबरु नका, मला काही होणार नाही. तुमच्या सारख्या अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.’ संवाद संपल्यानंतर खरंच या वाक्याचा प्रत्यय काही वेळातच आला. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यांना इजा झाली नाही. या प्रसंगाचे साक्षीदार असलेले औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद मधुकरराव चिलवंत यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
नेमके काय घडले?
हेलिकॉप्टर आकाशात झेपावल्यानंतर ९० ते १०० फुटांवर काहीसे स्थिरावले मात्र हवेचा दाब कमी झाल्याने ते अस्थिर झाले.
पायलटने लँडींगसाठी हेलिकॉप्टर खाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र, आकाशातील धुळीच्या लोटामुळे अंदाज न आल्याने विजेच्या तारांना हेलिकॉप्टरचा पंखा घासला आणि काही कळण्याच्या आत ते झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले.
कोसळण्यापूर्वी हेलिकॉप्टर रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला आणि भरत कांबळे यांच्या घराला घासले. या अपघातात जनसंपर्क अधिकारी केतन पाठक यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला.
मुख्यमंत्र्यांनी अॅलर्ट केले अन्...
‘टेक आॅफ’ नीट झालेले दिसत नाही. काहीतरी गडबड आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरमधील सर्वांना अॅलर्ट केले आणि त्यानंतरच्या पाचसहा सेकंदातच हेलिकॉप्टर कोसळले. मुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया सल्लागार केतन पाठक यांनी लोकमतला ही माहिती दिली. आपण सगळे सुरक्षित आहोत, टेन्शन घेण्याचं कारण नाही. आधी सगळे बाहेर पडूयात, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना हेलिकॉप्टरबाहेर येण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही बाहेर पडलो.
मुख्यमंत्र्यांचा मोबाइल हरवला
अपघातात मुख्यमंत्र्यांचा मोबाइल हरवला असून, अपघातस्थळी पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.