वादग्रस्त कंपनीचे हेलिकॉप्टर राज्य सरकारच्या सेवेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 02:04 AM2017-05-09T02:04:06+5:302017-05-09T02:04:06+5:30
राज्य सरकारने अतिमहत्वांच्या व्यक्तिंसाठी आॅगस्टा वेस्टलँड या विवादास्पद कंपनीचे हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्याने घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने अतिमहत्वांच्या व्यक्तिंसाठी आॅगस्टा वेस्टलँड या विवादास्पद कंपनीचे हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्याने घेतले आहे. सरकारच्या या कृतीवर काँग्रेसने आक्षेप घेतला असून भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कंपनीकडून हेलिकॉप्टर भाड्याने घेणे, हा भाजपा सरकारचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.
आॅगस्टा वेस्टलँड आणि फिनमेकॅनिका या कंपन्या दोषी आढळ्लायमुळे युपीए सरकारने या कंपन्यावर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरु केली होती. सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरु केली होती. परंतु भ्रष्टाचाराबाबत ओरड करणाऱ्या मोदी सरकारने गेल्या तीन वर्षात या कंपन्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट, मेक इन इंडिया आणि नेवल हेलिकॉप्टर खरेदी प्रक्रियेत या कंपनीला सहभागी करून घेतले. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिले होते की, आॅगस्टा वेस्टलँड आणि फिनमेकॅनिका संबंधित सहा कंपन्यांच्या सहभाग असणा-या सर्व खरेदी प्रक्रिया थांबविण्यात आल्या असून, या सरकारच्या काळात या कंपन्यांकडून कुठलीही नविन खरेदी केली जाणार नाही. तसेच नेव्हीसाठी १०० हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रक्रियेतूनही या कंपन्यांना वगळण्यात आले आहे, असे सरकारने सांगितले होते. तरीही फडणवीस सरकारने हेलिकॉप्टर भाड्याने घेतले.